दानोळी/निमशिरगांव : रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्याकोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक ते अंकली या महामार्गातील शेतक-यांना चौपट मोबदला मिळाल्याशिवाय भुसंपादन करू देणार नाही म्हणून निमशिरगांव ता. शिरोळ येथे जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकारी राष्ट्रीय महामार्ग अभियंता महेश पाटोळे याच्यासमोर शेतकऱ्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. शासनाने रत्नागिरी ते नागपूर या महामार्गाला चौपट मोबदला दिला आहे. मात्र याच मार्गातील अंकली ते चोकाक या मार्गावरील रस्त्यावर महाविकास आघाडी सरकारने केलेल्या दुप्पट मोबदल्याच्या कायद्यामुळे शेतक-यांचे नुकसान होत असल्याने शेतकरी संतप्त झाले.
दरम्यान, आज तमदलगे निमशिरगाव येथे मोजणीस आलेल्या तलाठी सुनील खामकर हे पंचनामा वाचून दाखवत असताना या अटी मला मान्य नाही म्हणत अविनाश कोडोले या शेतकर्यांने आत्मदहन करण्याच प्रयत्न केला. याच शेतक-याची शक्तीपीठ महामार्गात तीन एकर जमीन जात असल्याने शेतकरी भुमिहीन होणार आहे. यावेळी जुना रस्ता व नवीन रस्ता मागणीसाठी वेगवेगळ्या मागण्या शेतकऱ्यांच्यामधून येत होत्या.यावेळी विक्रम पाटील, सुधाकर पाटील, स्वस्तिक पाटील, शिवाजी कांबळे, बाळासाहेब संकपाळ, शीतल पाटील, सुरेश सावंत, चेतन खोंद्रे व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.