कुरुंदवाड : प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजाराचे अनुदान मिळावे, अशी मागणी शिरढोण (ता. शिरोळ) येथील शेतकरी विश्वास बालीघाटे यांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे. अनुदान न मिळाल्यास बेमुदत प्राणांतिक उपोषण करण्याचा इशाराही पत्रात लिहिले आहे. त्यामुळे सामान्य शेतकऱ्याच्या या पत्राची मुख्यमंत्री दखल घेणार की केराची टोपली दाखविणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.2019 च्या महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची तत्कालीन सरकारने कर्जमाफी केली होती. तर प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणार्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली होती. थकबाकीदार कर्जदारांचे कर्ज माफ झाले मात्र कर्जाची परतफेड करणारा शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतिक्षेत आहे.माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जाहीर करण्यात आलेला 50 हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. मात्र अद्याप अनुदान मिळाले नसल्याने शेतकरी बालीघाटे यांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून अनुदान मिळावा अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे या शेतकऱ्याच्या मागणीची दखल मुख्यमंत्री घेतात की या पत्राला केराची टोपली दाखवली जाते याकडे येथील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोल्हापुरातील शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना लिहिलं रक्ताने पत्र, केली 'ही' मागणी; अन्यथा..
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 1:21 PM