कोल्हापूर : लसीकरणासाठी नेणारी गाय उधळली अन तीने लाथाने तुटवत फरफटत नेल्याने शेतकरी ठार झाल्याची दुर्घटना परिते (ता. करवीर) येथे शनिवारी सकाळी घडली. सतीश शंकर कारंडे (वय ५० रा परिते) असे ठार झालेल्या दुर्दैवी शेतकर्याचे नाव आहे.नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, ‘लम्पी’ साथीच्या आजारावर जनावरांसाठी परिते गावात शनिवारी लसीकरण मोहीम सुरु होती. त्यासाठी सतिश कारंडे व त्यांची पत्नी यांनी आपल्या एका गायीला लसीकरण करुन गोठ्यात नेऊन बांधले. दुसर्या गायीला नेण्यासाठी तिचा कासरा सोडला. त्यावेळी अचानक गाय उधळली. गायीचा धक्का लागल्याने कारंडे हे जमीनीवर पडले, गायीने त्यांना पायाखाली अक्षरशा तुडवले. त्यांच्या पत्नीने आरडा-ओरडा केला, पण उधळलेल्या गायीने कारंडे यांना गोठ्यात फरफटल्याने गंभीर दुखापत होऊन ते बेशुध्द पडले.
गोंधळ उडाल्याने शेजारील नातेवाईकांनी जनावरांच्या गोठ्यात धाव घेतली. त्याचा मुलगा व नातेवाईकांनी त्यांना तातडीने कोल्हापूरात सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व दोन भाऊ असा परिवार आहे.