Kolhapur: इच्छुक ढीगभर, यादी जाहिर झाल्यावरच लढतीचे 'उत्तर'; राजेश क्षीरसागरांना कोण आव्हान देणार ही उत्सुकता
By भारत चव्हाण | Published: October 18, 2024 04:40 PM2024-10-18T16:40:04+5:302024-10-18T16:42:38+5:30
काँग्रेसकडून एक नवीन, आक्रमक व क्षमता असलेला उमेदवाराचा शोध
भारत चव्हाण
कोल्हापूर : ‘कोल्हापूर उत्तर’ मतदारसंघातील उमेदवारीसाठी महाआघाडीच्या काँग्रेस, उद्धवसेनेत जेवढी चढाओढ आहे तेवढीच ती महायुतीतील भाजप, शिवसेनेतही (शिंदेसेना) आहे. हे सगळे चित्र येत्या दोन-तीन दिवसांत स्पष्ट होणार असले तरी प्रत्यक्ष लढत शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी होईल, असे दिसते. त्यामुळे शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात कोण? एवढीच उत्सुकता लागून राहिली आहे.
या मतदारसंघात शिवसेना आणि काँग्रेस यांचेच वर्चस्व राहिले आहे. मात्र, शिवसेनेला भाजपची, तर काँग्रेसला राष्ट्रवादीची मदत मिळते हेही विसरून चालणार नाही. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे गट पडल्याने कोणाची किती ताकद चालणार हे निकालानंतरच कळणार आहे. लढते कोण? याबरोबरच इच्छुक असलेले उमेदवारी न मिळाल्यास काय भूमिका घेतात, यावरही लढतीतील चुरस अवलंबून असेल.
शिंदेसेनेकडून राजेश क्षीरसागर, भाजपकडून सत्यजित कदम, महेश जाधव, अजित ठाणेकर यांनी उमेदवारी मागितली आहे. काँग्रेसकडून आमदार जयश्री जाधव, सचिन चव्हाण, राजू लाटकर, वसंत मुळीक, शारंगधर देशमुख यांनी, तर उद्धवसेनेकडून संजय पवार, रविकिरण इंगवले यांनी उमेदवारी मागितली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाकडून व्ही. बी. पाटील इच्छुक आहेत. हा मतदारसंघ उद्धवसेनेला मिळावा म्हणूनही आग्रह धरला जात आहे.
क्षीरसागर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असल्याने त्यांची उमेदवारी निश्चित असल्याचे मानले जाते. त्याआधी भाजपला आपला हक्क सोडावा लागेल. मग सत्यजित कदम काय करणार हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. काँग्रेसकडून ज्यांनी ज्यांनी उमेदवारी मागितली आहे, त्यांच्या निवडून येण्याच्या क्षमतेवर पक्षनेतृत्वाचाी शंका आहे. म्हणून काँग्रेसकडून एक नवीन, आक्रमक व क्षमता असलेला उमेदवाराचा शोध सुरू आहे.
त्यातूनच मधुरिमाराजे यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. शाहू छत्रपती यांनी नुकतीच लोकसभेची निवडणूक जिंकली असल्याने पुन्हा त्यांच्याच घरातील व्यक्ती आमदारकीची निवडणूक लढविण्यास तयार होईल, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. काँग्रेसचा आग्रह असला तरी तशी छत्रपतींची मानसिक तयारी दिसत नाही.
२०२२ ची पोटनिवडणूक
- जयश्री जाधव (काँग्रेस) - ९६ हजार १७६
- सत्यजित कदम (भाजप) - ७७ हजार ४२६
- पुरुष मतदार - १,४८,१३०
- महिला मतदार - १,५२,०१९
- एकूण मतदार - ३,००,१६६