पोपट पवारकोल्हापूर : एखाद्या दुकानदाराकडून आपण कोणतीही वस्तू खरेदी करतो. मात्र, ती वस्तू देताना दुकानदाराने मापात पाप केल्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी वस्तू खरेदी केल्यानंतर ज्यांना वजनाच्या मापात त्रुटी आढळल्या त्या सजग ग्राहकांनी वैधमापनशास्त्र विभागाकडे तक्रार केल्यानंतर या विभागाने कोल्हापूर जिल्ह्यात आठ महिन्यांत १९२ दुकानदारांच्या लबाडीला चाप लावला. या विभागाने एप्रिल ते नोव्हेंबर २०२४ या काळात जिल्ह्यातील १९२ आस्थापनांवर कारवाई केली. मापात पाप करणाऱ्यांकडून ७ लाख ३० हजार रुपयांचा दंडही वसूल केला.दैनंदिन जीवनात वस्तू खरेदी करत असताना संबंधित विक्रेता आपली फसवणूक करण्याची दाट शक्यता असते. सहज कमी वजनाच्या वस्तू तो आपल्याला योग्य दिल्याचे देखील भासवू शकतो. दूध, दुग्धजन्य पदार्थ, किराणा, फळे, पेट्रोल-डिझेल, गॅस अशा विविध वस्तूंच्या विक्रीमध्ये बिनधास्तपणे सावळा गोंधळ पाहायला मिळतो. विक्री हाेणाऱ्या वस्तूंवर वस्तूचे वजन, एमआरपी, उत्पादक, उत्पादनाचा महिना, पत्ता या बाबी लिहिणे बंधनकारक आहे.या नियमांची अंमलबजावणी केली जाते की नाही हे पाहण्याची जबाबदारी वैधमापनशास्त्र विभागाकडे आहे. वजन-काटे बरोबर नसतील किंवा वस्तूवर एमआरपी नसेल तर ग्राहक थेट या विभागाकडे तक्रार करू शकतात. गेल्या आठ महिन्यांत आलेल्या तक्रारीनुसार या विभागाने १९२ आस्थापनांच्या वजन-काटे व वस्तूंची पडताळणी करून त्यांच्यावर कारवाई केली.
पडताळणीतून कोट्यवधी रुपयांचे शुल्क जमाप्रत्येक आस्थापनांमधील वजन-काट्याची प्रत्येक वर्षी पडताळणी करणे बंधनकारक आहे. यासाठी आस्थापनांकडून ठराविक शुल्क आकारले जाते. एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत एक कोटी ५१ लाख ३१ हजार ७५५ रुपये इतके शुल्क जमा झाले आहे.
अशी झाली कारवाई
- वजन-काट्यांत घोळ : १४०
- पॅकिंग वस्तूंचे वजन प्रत्यक्षात कमी भरणे : ५२
वजन-काट्याबाबत कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी वैधमापनशास्त्र विभागाकडे तक्रार करावी. याची चौकशी करून कारवाई करण्यात येईल. - दत्तात्रय पवार, उपनियंत्रक, वैधमापनशास्त्र विभाग, कोल्हापूर.