विक्रम पाटीलकरंजफेण : शॉर्ट सर्कीटमुळे पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथील शाहू कुस्ती संकुलाला आग लागली. या आगीत पैलवानांची पदके, मॅट तसेच इतर साहित्य जळाल्यामुळे मोठे नुकसान झाले. काल बुधवारी (दि.१४) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. कुस्ती संकुलाचे नुकसान भरून काढण्यासाठी समाजातील दानशूरांनी मदत करण्याची गरज आहे. कोतोली येथील मुख्य रस्त्याच्या बाजूस छत्रपती राजर्षी शाहू कुस्ती संकुल आहे. येथे पंन्नासहून अधिक महिला कुस्ती प्रशिक्षण घेतात. मागील पाच वर्षापासून कुस्ती केंद्र कार्यरत आहे. या आखाड्यातून अनेक महिला कुस्ती मल्ल राष्टीय स्तरापर्यंत पोहचल्या आहेत. येथे कुस्तीसह ज्युदो खेळाचे देखील प्रशिक्षण दिले जाते. दरम्यान मध्यरात्री शार्टसर्कीटमुळे संकुलामध्ये आग लागली. रबरी मॅट तसेच साहित्याला आग लागल्याने धूर व वास परिसरात पसरल्याने ही घटना नागरीकांच्या लक्षात आली. तत्काळ नागरीकांनी पाण्याने आग विझविली. मात्र तो पर्यंत मॅट तसेच खेळाची कपडे, ट्राफ्या इ. जळाल्याने संकुलाचे मोठे नुकसान झाल्याचे प्रशिक्षक श्रीकांत पाटील यांनी सांगितले.
कोल्हापुरातील कोतोली येथील कुस्ती केंद्राला आग, पैलवानांची पदके जळाली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 6:25 PM