निपाणी : पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटात मालवाहू ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे क्रूझर, दोन कार व दुचाकी यांचा विचित्र अपघात झाला. अपघातात क्रूझरमधील एकजण जागीच ठार झाला. नारायण नागू पारवाडकर (वय ६५, रा. जांबोटी, ता. खानापूर, जि. बेळगाव) असे मृताचे नाव आहे. क्रूझरमधील १५, दुचाकीवरील दोन असे १७ जण जखमी झाले आहेत. गंभीर दोघांवर बेळगाव येथे उपचार सुरू आहेत. काल, गुरुवारी हा अपघात झाला.क्रूझरमधील मोहन नागू पारवाडकर (वय ५७), विद्या मोहन पारवाडकर (४७), शंकर मोहन पारवाडकर (२८), प्रतीक्षा मोहन पारवाडकर (२२), प्रियांका मोहन पारवाडकर (२६), पूनम महेश देवळे (२६), आयेशा महेश देवळे (५), आयुष महेश देवळे (३), सुहास बाबली पारवाडकर (४०), स्वाती सुहास पारवाडकर (३५), संग्राम सुहास पारवाडकर (१२), वैष्णवी मोहन घाडे (२५), प्रमोद मारुती पारवाडकर (२६), रेश्मा राजन कुडतुरकर (४५), चालक नागराज जनार्दन सडेकर (४४, सर्व रा. जांबोटी), दुचाकीस्वार संतोष विटेकरी (४२), अंजना विटेकरी (३५ रा. गडहिंग्लज) अशी जखमींची नावे आहेत.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, जांबोटी येथील पारवाडकर कुटुंबीय आपल्या नातेवाइकांसोबत क्रूझरमधून बेळगावहून कोल्हापूरला अंबाबाई व जोतिबा येथे देवदर्शनासाठी निघाले होते. त्यांची क्रूझर तवंदी घाटात आली त्यावेळी पाठीमागून तामिळनाडूहून मुंबईकडे नारळ भरून निघालेला ट्रक येत होता. तवंदी घाटातील व्हाईट हाऊसजवळ ट्रक येताच चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने क्रूझरला ट्रकची जोरदार धडक बसली. त्यामुळे उलटलेली क्रूझर विरुद्ध दिशेला कोल्हापूरहून आजऱ्याकडे लग्नाचे साहित्य घेऊन जाणाऱ्या कारवर आदळली. तसेच गडहिंग्लजकडे जाणाऱ्या दुचाकीस्वारालाही क्रूझरची धडक बसली.
दरम्यान, भरधाव ट्रकने हॉटेल अमरजवळ कोल्हापूरकडे जाणाऱ्या अन्य एका कारलाही ठोकर दिली आणि रस्त्यालगतच्या शेतवडीत आदळला. त्यामुळे दोन्ही कारचे किरकोळ, तर क्रूझरसह ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, गंभीर जखमी रेश्मा कुडतरकर व शंकर पारवाडकर यांना उपचारासाठी बेळगावला पाठविण्यात आले. इतरांना किरकोळ दुखापती झाल्याने त्यांच्यावर येथील महात्मा गांधी रुग्णालयात उपचार करण्यात आले. निपाणी शहर पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे.जांबोटी गावात हळहळ!मृत नारायण पारवाडकर हे सर्वसामान्य शेतकरी असून मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, ३ मुली, २ मुलगे असा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य जखमी झाल्याने जांबोटी गावात हळहळ व्यक्त होत आहे.