कोल्हापूर : किरकोळ वादातून मित्राचा भोसकून खून केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने कागलमधील दोघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्र. ३) एस. एस. तांबे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सिद्धेश कुशनचंद चव्हाण (२९, रा. ठाकरे चौक, ता. कागल) आणि वैभव अमरसिंग रजपूत (२६, रा. जुनी बस्ती गल्ली, कागल) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. ८ जून २०१९ मध्ये सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कागलमधील आंबिलकट्टी रोड येथे झालेल्या मारहाणीत सूरज नंदकुमार घाटगे (२४, रा. अंबिलकट्टी रोड, कागल) याचा खून झाला होता.सरकारी वकील मंजूषा पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज घाटगे हा कागलमधील अंबिलकट्टी रोडवरील घरी त्याची आई, वडील आणि बहिणीसोबत राहत होता. कागल एमआयडीसीत एका कंपनीत काम करून तो कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला हातभार लावत होता. ८ जून २०१९ रोजी तीन मित्र त्याला बोलावण्यासाठी आले.
मित्रांच्या दुचाकीवरून सूरज त्यांच्यासोबत महामार्गाच्या दिशेने गेला. काही वेळातच दिनकर घाटगे यांनी सूरजच्या घरी येऊन त्याला मारहाण झाल्याची माहिती दिली. आई सुरेखा आणि सूरजची बहीण प्रेरणा यांनी तातडीने गेल्या. त्यांना सूरज गंभीर जखमी स्थितीत पडल्याचे दिसले. त्याला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.साक्षी ठरल्या महत्त्वाच्यासाक्षीदार गौरव नाईक, वैद्यकीय अधिकारी डॉ. गुरुनाथ दळवी, पंच अनंतकुमार खोत, तलाठी संजय सुतार, अरुण हणवते यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. साक्षीदारांच्या साक्षी आणि सरकारी वकील मंजूषा पाटील यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून शिक्षा सुनावली. या गुन्ह्यात तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक पी. पी. पुजारी, महिला हेड कॉन्स्टेबल मीनाक्षी तिसरे यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.