गारगोटी: गारगोटी-मुदाळ मार्गावरील कुर येथे कालव्याजवळील रस्त्यावर खासगी बसच्या धडकेत गव्याचा जागीच मृत्यू झाला. आज, मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत माहिती अशी की, कूर येथील कालव्याजवळील रस्त्यावर आज पहाटे कोल्हापूरहून गारगोटीकडे येणाऱ्या खासगी बसच्या गवा आडवा आला. गव्याला बसची जोराची धडक बसल्याने गव्याचा जागीच मृत्यू झाला. धडकेत खासगी बसचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती वन विभागाला मिळताच अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी गारगोटी येथील रेस्क्यू टीमने वनविभागाला सहकार्य केले. या घटनेचा पंचनामा पशुवैदयकिय अधिकारी डॉ.संजय दगडू, वनपाल मारुती डवरी, वनरक्षक व्हि ए बोंडे, एस.एस. चौगले, वनसेवक बजरंग देसाई यांनी केला. चारा न मिळाल्याने वन्यप्राण्याचा शेतीकडे मोर्चा जंगलात आगी लावण्याच्या घटना घडत असल्याने चारा न मिळाल्याने वन्यप्राणी गावाशेजारी असलेल्या उसाच्या शेतीकडे आपला मोर्चा वळवतात. उसाच्या शेतात असलेला मक्का,शाळू खाऊन फस्त करतात. दरवर्षी मार्च महिन्यानंतर अशा घटनेत वाढ होते. या मार्गावर असलेली वाहतूक पाहता जर मोटारसायकलस्वाराला धडक बसली असती तर अनर्थ घडला असता.
Kolhapur: खासगी बसच्या धडकेत गव्याचा मृत्यू, गारगोटी-मुदाळ मार्गावरील कुर येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 6:20 PM