संदीप आडनाईककोल्हापूर : सध्याच्या एन्सोच्या तटस्थ काळात दक्षिण गोलार्धातील हवेच्या उच्च दाबाचा 'मस्करीन हाय' हा त्याच्या सरासरी दाबापेक्षा गेल्या काही दिवसांपासून कमी-अधिक आहे. विशेषतः कमीच आहे आणि हीच स्थिती मजबूत नसल्यामुळे ताकदीने सह्याद्री ओलांडणाऱ्या मोसमी वाऱ्याचा अभाव जाणवत आहे. म्हणून खान्देश ते कोल्हापूर आणि सोलापूरपर्यंतच्या वर्षाच्छायेच्या प्रदेशात सध्या कमी पावसाचा अनुभव घ्यावा लागत आहे, असे मत निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले आहे.रविवारी अति जोरदार पाऊस पडल्यानंतर सध्या कमी पावसाचा अनुभव घ्यावा लागत आहे. तीन आठवड्यांपासून मुंबईसह कोकण आणि गोव्यासाठी अति जोरदार पाऊस पडावा असेच वातावरण जुलै अखेरपर्यंतही टिकून आहे. या शक्यतेबरोबरच अधून-मधून कोकणसाठी कधी रेड तर कधी ऑरेंज असे अलर्ट दिले जातात. राज्यात रंगीत अलर्ट म्हणजे हाहाकार माजविणारा पाऊस अधिक तीव्रतेच्या पावसाचे सूचक आहेत असे नाही, असा खुलासा खुळे यांनी केला आहे.
रंगीत अलर्ट कशासाठी..रंगीत अलर्ट म्हणजे पावसाची अति तीव्रता असा सरळ अर्थ नाही. पावसाबरोबर ढगफुटी, महापूर, विजा पडणे, गारपीट होणे, छोटे छोटे तलाव फुटणे, शेतीपिके वाहून जाणे, कच्ची घरे, इमारतींची पडझड होणे अशा प्रकारच्या आपत्तींची शक्यता असल्यामुळे सावधानता बाळगणे, प्रशासनाला नियोजनासाठी सूचना देण्यासाठी तसेच मानवी जीवित व वित्तहानीच्या धोक्यापासून बचावासाठी हे अलर्ट आहेत. अति तीव्रतेच्या पावसासाठी वेगळी सूचक दर्शकता असते. कोकणातील मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघर येथे पाऊस तर होतोच आहे, परंतु त्यापेक्षाही गोव्यासहित संपूर्ण सिंधुदुर्ग, दक्षिण रत्नागिरी तसेच रायगड जिल्ह्यातील काही भागांत अधिक तीव्रतेचा म्हणजे १५ सें.मी.ते २५ सें.मी. इतका पाऊस सध्या होत आहे. दि. १२ जुलैपासून उत्तर कोकणातील जिल्ह्यात अधिक पावसाची शक्यता जाणवते.
'ऑफ-शोर-ट्रफ'मुळे मध्यम पाऊसअरबी समुद्रात दक्षिण गुजरात ते केरळ पश्चिम किनारपट्टी समांतर दक्षिणोत्तर अशा अंदाजे १५०० किमी लांबीची व समुद्रसपाटीपासून साधारण दीड किंवा त्यापेक्षा अधिक उंचीपर्यंत हवेच्या कमी दाब क्षेत्राचा निर्वात पोकळीचा पट्टा म्हणजेच इंग्रजी 'व्ही' अक्षरासारखा द्रोणीयतटीय आस म्हणजेच त्याला 'ऑफ-शोर-ट्रफ ' म्हणतात. सध्या त्याच्या अस्तित्वामुळे कोकण, घाटमाथा येथे जोरदार ते मध्यम पाऊस होत आहे.