जोतिबा : दख्खनचा राजा श्री जोतिबाचा रविवारचा पहिला खेटा चांगभलंच्या गजरात उत्साहात पार पडला.श्री जोतिबाच्या खेट्यांच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली. जोतिबाचे चार खेटे करण्याची प्रथा आहे. रविवारच्या मध्यरात्रीपासूनच भाविकांनी जोतिबा डोंगरावर गर्दी करायला सुरुवात केली होती. रविवारी पहाटे ४ वाजता घंटानाद होऊन मंदिराचे चारही दरवाजे दर्शनासाठी खुले करण्यात आले. यानंतर मंदिरातील इतर नित्य धार्मिक विधी पार पडले. दुपारी बारा वाजता धुपाराती सोहळा झाला. यावेळी श्रींचे पुजारी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे प्रभारी व्यवस्थापक जयकुमार तिवले, सर्व देवसेवक आणि भाविक उपस्थित होते. रात्री ८.३० वाजता पालखी सोहळ्यास सुरुवात झाली. रात्री ११ वाजता मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले. दरम्यान, आज पहिल्या खेट्यानिमित्त भाविकांनी जोतिबा मंदिरात प्रचंड गर्दी केली होती. खेट्यांच्या यात्रेसाठी देवस्थान समितीच्या वतीने जोतिबा मंदिरामध्ये सुरक्षा रक्षकांची वाढ केली होती. दर्शन रांगेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कैलास कोडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
चांगभलं! जोतिबाचा पहिला खेटा मोठ्या उत्साहात, भाविकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 12:18 PM