दत्तात्रय धडेल नवदाम्पत्यजोतिबा: क्षेत्र जोतिबा डोंगरावर वावर जत्रासाठी नवदाम्पत्यांची मोठी गर्दी होत आहे. जोतिबाचे दर्शन घेत नवदाम्पत्य सुखी संसारासाठी देवासमोर साकडे घालत आहेत. यासोबत भाविकांची गर्दी असल्याने मंदिर परिसर फुलून गेला आहे.वैशाख महिना सुरू झाल्याने लग्न सराईचा हंगाम सुरू आहे. लग्न झाल्यानंतर नवदाम्पत्य वावरजत्रा हा कुलाचार विधी करण्यासाठी जोतिबा मंदिरात येतात. त्यामुळे सध्या नव-वधुवरांची गर्दी वाढू लागली आहे. पारंपारीक पद्धतीने पुजाऱ्याच्याकडून हा कुलाचार विधी केला जात आहे. देवाच्या साक्षीने परत एकदा लग्नगाठ मारुन जोडीने पान सुपारीचा विडा व श्रीफळ ठेवून देवाचा सुखी संसारासाठी आशिर्वाद घेतात. देवाला संपुर्ण पोषाख, लग्नाचा आहेर देऊन आपल्या कुलवधुची पारंपारिक पधतीने उखाना घेऊन परिचय दिला जातो. ओटीत आशिर्वादाचा नारळ घेऊन नवदांपत्य मंदिराच्या पाच प्रदक्षिणा घालतात. श्री.यमाई देवीला खणा नारळांची ओटी नववधु अर्पण करतात. यमाई देवीच्या मंदिरात पीठ मीठ अर्पण करून आमचाही संसार पीठ मीठाने सतत भरून राहू दे म्हणून देवीला साकडे घालत आहेत. मंदिराच्या पाठीमागे खापरांची उतरंड लावून संसाराची सुरुवात येथुनच करण्याची प्रथा आहे. लग्नाचा गोंधळ आणि घुगुळ हा कुलाचार विधी ही जोतिबा मंदिरात होत आहेत. वावर जत्राचे उखाणे, लग्न गोंधळांचे डवर आणि घुगुळांच्या ढोलांचे आवाज मंदिर परिसरात घुमू लागला आहे.
क्षेत्र जोतिबा डोंगरावर वावर जत्रासाठी नवदाम्पत्यांची मोठी गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2023 6:06 PM