कोल्हापूर : ऊसतोड मजूर कुटुंबातील एका विवाहितेला प्रसूतीसाठी कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले; पण ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे डॉक्टरांच्या अहवालानंतर अल्पवयीन विवाह प्रतिबंधक व बाललैंगिक कायद्यान्वये बीडमधील पेठ बीड पोलिस ठाण्यात पती, आईसह सासू-सासऱ्यांवर बुधवारी (दि.१) गुन्हा नोंद झाला.पोलिसांच्या माहितीनुसार, शहरातील पेठ बीड हद्दीतील १७ वर्षे १४ दिवस वय असलेली एक विवाहिता कोल्हापूर येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये २९ जानेवारीला पहाटे प्रसूतीसाठी दाखल झाली होती. तपासणी केली तेव्हा ती नऊ महिन्यांची गर्भवती आढळली.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. कलगोंडा पाटील यांनी आधार कार्ड मागितले. त्यात वय कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी अधिक चौकशी केली असता, पीडित विवाहिता ही मजूर कुटुंबातील असून, तिचा विवाह ३ जुलै २०२१ रोजी बीडमधील एका तरुणाशी लावल्याचे लक्षात आले. लग्नानंतर पतीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गरोदर राहिली. मात्र, अल्पवयात विवाह व लैंगिक संबंध हे कायद्याने गुन्हा असल्याने डॉ. कलगोंडा पाटील यांनी पेठ बीड पोलिसांना अहवाल पाठविला.दरम्यान, २९ जानेवारी रोजी पीडितेची प्रसूती झाली. तिला गोंडस बाळ जन्माला आले. या माय-लेकरावर कोल्हापूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याचा तपास पिंक मोबाइल पथकाच्या प्रमुख व उपनिरीक्षक मीना तुपे यांच्याकडे सोपविला आहे.आनंद औटघटकेचापीडित महिला पतीसमवेत ऊसतोडणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात आली आहे. घरात नवा पाहुणा आल्याने कुटुंब सुखावले होते; पण दुसरीकडे कायदेशीर कारवाईचा ससेमिरा मागे लागल्याने हा आनंद औटघटकेचा ठरला. पती, सासू-सासरा व आई या चौघांचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे.
Kolhapur News: प्रसूतीसाठी रुग्णालयात गेले, गोंडस बाळाला जन्म दिला; अन् घडलं भलतंच
By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2023 4:10 PM