कोल्हापूर : जिल्ह्याचा वैद्यकीय आधारवड म्हणून ओळख असलेल्या येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीयमहाविद्यालय यांचा विस्तार, नवीन होणारी तीन सुसज्ज रुग्णालये, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभागीय कार्यालय आणि परिचारिका महाविद्यालय यामुळे शेंडा पार्कमध्ये नवी वैद्यकीय नगरीच साकारत आहे. अशातच हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण विभागाचा कार्यभार आल्याने या सर्वच कामकाजाला मोठी गती मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.
शहराच्या शेंड्याला असलेले ते शेंडा पार्क. दिवंगत आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या अथक प्रयत्नातून २००१ मध्ये कोल्हापूरमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय साकारले. त्याचवेळी या महाविद्यालयाच्या विस्तारीकरणासाठी ४० एकर जमीन संपादित करण्यात आली होती. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचा कार्यभार या महाविद्यालयाकडे गेला. परिणामी गेल्या काही वर्षात या महाविद्यालयाचा विस्तार शेंडा पार्कमध्ये सुरू झाला. विद्यार्थ्यांना एकाच छताखाली दर्जेदार वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी जागेअभावी सर्वच विभाग शेंडा पार्कमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहेत.विविध विभागांच्या इमारती, जिमखाना, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, अधिष्ठाता निवासस्थान, ग्रंथालय, परीक्षा भवन, शिक्षकांची निवासस्थाने पूर्ण झाली आहेत. एमबीबीएस दुसऱ्या वर्ष विभागाच्या इमारती, औषधशास्त्र, विकृतीशास्त्र, सूक्ष्म जीवशास्त्र, सामाजिक औषध वैद्यकशास्त्र विभागासह विद्यार्थ्यांसाठी उपाहारगृह या इमारतींचे बांधकाम याधीच पूर्ण झाले आहे. सध्या अधिष्ठाता कार्यालय, परीक्षा भवन, मध्यवर्ती ग्रंथालयाच्या भव्य इमारती मुख्य प्रवेशव्दाराजवळच्या परिसरात दोन वर्षांपूर्वी उभारण्यात आल्या आहेत.सध्या या ठिकाणी १८० खाटांचे मुलींचे वसतिगृह, न्यायवैद्यकशासत्र विभागाच्या अंतर्गत असणारे शवागृह, ऑडिटोरियम इमारत येत्या दोन महिन्यात पूर्ण होणार आहेत. यासोबतच आरोग्य विभागाकडून १०० खाटांचे माता बालक रुग्णायाचे बांधकाम सुरू आहे. भविष्यात या ठिकाणी १८० खाटांच्या क्षमतेचे मुलींचे वसतिगृहही होणार आहे. या परिसरातील सर्व गटारांचे काम झाले असून सिंमेट काँक्रीटच्या रुंद रस्त्यांमुळे हा परिसर सुसज्ज बनल्याचे पहावयास मिळत आहे.
वृक्षारोपण करण्यावर भरवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. माेरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, डॉ. गिरीश कांबळे यांच्यासह विभागप्रमुखांनी या संपूर्ण परिसरात जाणीवपूर्वक पूरक वृक्षारोपण करण्यावर भर दिला आहे. वनीकरण विभागाच्या मार्गदर्शनाखाली १ हजार देशी, विदेशी झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला असून या झाडांचा भविष्यात अडथळा होऊ नये यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.
लवकरच काम सुरू होणारे प्रकल्प
- सहाशे खाटांचे सर्वसाधारण रुग्णालय
- अडीचशे खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय
- अडीचशे खाटांचे कर्करोग रुग्णालय
मी या खात्याचा कार्यभार हाती घेतल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला उत्तम आरोग्य सुविधा देण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार कामाला सुरुवात केली. शेंडा पार्क येथे लवकरच तीन नव्या रुग्णालयांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. या कामासाठी एल ॲन्ड टी या ख्यातनाम कंपनीला ठेका देण्यात आला आहे. ही तीनही रुग्णालये पूर्ण झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील आरोग्यसेवेत नवा अध्याय सुरू होईल. - हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र