कसबा बावडा : येथील शिये रोडवरील श्रीराम सेवा संस्थेच्या पेट्रोल पंपाजवळील एका रिकाम्या कचराकुंडीत दीड दिवसाचे स्त्री अर्भक कुण्या निर्दयी आई-बापाने टाकून दिल्याचे रविवारी सकाळी उघड झाले. सकाळी कचऱ्याचा उठाव करण्यासाठी आलेल्या महानगरपालिका आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या अर्भकाला तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केल्याने बाळाला जीवदान मिळाले. कितीही प्रबोधन केले तरी अजूनही नको असलेली मुलगी रस्त्यावर टाकून देण्याची मानसिकता समाजातून कमी झालेली नाही याचेही प्रत्यंतर आले. या घटनेची शाहूपुरी पोलिसात नोंद झाली.
घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी की, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी बापू घाटगे व घंटागाडीचे चालक विजय डोंगळे सकाळी साडेआठच्या सुमारास श्रीराम पेट्रोल पंपासमोर उघड्या कोंडाळ्यात पडलेला कचरा एकत्रित करत होते. खोऱ्याने कचरा ओढताना त्यांना लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी हाताने कचरा बाजूला करून पाहिले असता पोत्यासह प्लास्टिकच्या कागदात गुंडाळलेले स्त्री अर्भक दिसले. त्यांनी तत्काळ ही माहिती आरोग्य निरीक्षकांना दिली.
संबंधितांनी काही स्थानिक नागरिकांच्या मदतीने रिक्षाने या अर्भकाला दुसऱ्या कपड्यात गुंडाळून सेवा रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याची स्वच्छता व किरकोळ उपचार करून पुढील उपचारासाठी त्यास रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये नेण्यात आले. कमी कालावधीत जलदगतीने उपचार झाल्याने त्याचा जीव वाचला. सकाळी थंडी असल्याने त्याच्या शरीराचे तापमान कमी झाले होते. त्यामुळे त्याला पेटीत ठेवण्यात आले आहे.
नाळही तशीच..हे अर्भक त्याच परिसरात प्रसूती झालेल्या महिलेचे असण्याची शक्यता आहे. पोलिसांना सीसीटीव्ही तपासण्याच्या सूचना बालकल्याण समितीने दिल्या आहेत. अर्भकाला एका बाजूला खरचटले आहे. त्याची नाळही ताजीच होती. गोंडस बाळ पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
मृत्यू व्हावा असाच प्रयत्न
या नवजात अर्भकाचा मृत्यू व्हावा या हेतूने त्यास राख आणि मिरच्या घातलेल्या राखाडी रंगाच्या गाऊनमध्ये गुंडाळून टाकले होते, असे पोलिस तपासात पुढे आले आहे.
आम्ही सांभाळतो म्हणून आले पालकसेवा रुग्णालयात असे अर्भक आल्याचे समजताच त्याच परिसरातील काही पालक आम्ही तिला आयुष्यभर सांभाळतो म्हणून आले होते; परंतु असे कोणतेही बाळ कुणाला परस्पर सांभाळायला दिले जात नाही. सीपीआरमधून तिचा डिस्चार्ज झाल्यावर बालकल्याण समितीच्या सूचनेवरून शिशूगृहात ठेवले जाईल. तिच्या पालकांचा शोध घेतला जाईल. पालक मिळाले नाहीत तरच समिती कायदेशीर दत्तक प्रक्रिया राबवून तिचे पुनर्वसन करते; परंतु त्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती बालकल्याण समितीच्या सदस्या ॲड. शिल्पा सुतार यांनी दिली.