विश्वास पाटीलकोल्हापूर : वजनमापे तपासणीच्या नावाखाली जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर छापा टाकून लुबाडणूक करणाऱ्या वजनमापे कार्यालयाच्या अधिकाऱ्यास (नाव लोकमतकडे उपलब्ध आहे.) एका दुसऱ्याच खात्यातील अधिकाऱ्याने गुरुवारी सायंकाळी रंगेहात पकडून दिले. त्याने गोकुळ शिरगावजवळील एका पंपावर घेतलेले २५ हजार रुपये वरिष्ठांकडे तक्रार करून त्यास परत द्यायला भाग पाडले. परंतु, पैसे परत दिले म्हणजे चूक माफ का, अशी विचारणा आता होऊ लागली आहे. या अधिकाऱ्यावर कारवाईचा ‘योग’ कधी येणार हीच उत्सुकता आहे.घडले ते धक्कादायकच होते. सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती सप्ताह सुरू आहे. हा विभाग लोकांत लाच देऊ नका म्हणून प्रबोधन करीत आहे आणि सरकारी कर्मचाऱ्यांची राजरोस लुबाडणूक सुरू असल्याचे अनुभव येत आहेत. वजनमापे निरीक्षक कार्यालयाच्या एका पथकाने गुरुवारी जिल्ह्यातील अनेक पंपांवर छापे टाकले. त्यांनी छापे टाकावेत, पंपावरून पेट्रोल-डिझेलचे वितरण मापानुसार होते का याची जरूर चौकशी करावी, परंतु तसे न करता तपासणी करून थेट पैशांचीच मागणी केली गेल्याच्या तक्रारी झाल्या.गोकुळ शिरगावजवळच्या एका पंपावर हे पथक सायंकाळी गेले. तपासणी केली व तेथील कर्मचाऱ्यांकडे थेट २५ हजारांची मागणी केली. पैसे द्या नाहीतर पंपाला सील ठोकतो अशी भीती घालण्यात आली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यास २५ हजार रुपये दिले. त्यानंतरच हे पथक तेथून निघून गेले. ते गेल्यावर पंपावरील व्यवस्थापकाने याबाबत एका सरकारी अधिकाऱ्याला माहिती दिली. त्याने वैधमापन नियंत्रक विभागाच्या राज्याच्या प्रमुखांचा नंबर मिळविला व त्यांना आपल्या अमूक या अधिकाऱ्याने असा व्यवहार केल्याची तक्रार केली.त्यांनी त्याची दखल घेऊन संबंधित अधिकारी अर्धा तासात त्या पंपावर जाऊन पैसे परत करेल असे सांगितले. त्यानुसार त्या अधिकाऱ्याने पैसे परत केल्याचे समजते. भ्रष्टाचार केला आणि सापडल्यावर पैसे परत केले म्हणजे सगळे माफ झाले का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. या अधिकाऱ्यावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे
कोल्हापूरात पेट्रोल पंपावर छापा, २५ हजार रुपये उकळले; अधिकाऱ्यानेच अधिकाऱ्याला पकडून दिले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2022 6:07 PM