रमेश सुतार
गणेशवाडी : खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील प्राचीन कोपेश्वर मंदिराच्या स्वर्गमंडपाच्या मध्यभागी वर्तुळाकार चंद्र आणि शिलेवरचा चंद्रप्रकाशाचा नयनरम्य योगायोग रविवारी (दि.२६) रात्री हजारो पर्यटकांनी अनुभवला. काहीवेळानंतर संपुर्ण मंदिर चंद्रप्रकाशाने उजळून निघाले होते.शिलेला व्यापणारा त्रिपुरारी पौर्णिमेचा शीतल चंद्र प्रकाशाचा उजेड रविवारी रात्री ११ वाजून १३ मिनिटांनी अर्धगोलाकार भागात मध्यवर्ती ठिकाणी शिलेवर पडला होता. मध्यभागी चंद्र आणि शिलेवरचा चंद्रप्रकाशाचा नयनरम्य योगायोग अनुभवण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातील पर्यटक आणि भक्तांनी मोठी गर्दी केली होती.मंदिरात आकर्षक रांगोळी रेखाटून त्याभोवती दिवे लावण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. स्वर्गमंडपाच्या मधोमध असणाऱ्या वर्तुळाकार झरोक्याच्या बरोबर खाली जमिनीवर अगदी त्याच आकाराचा वर्तुळाकार दगड आहे त्याला ‘चंद्रशिला’ असे म्हटले जाते.स्वर्गमंडपाच्या वर्तुळाकार झरोक्यामधून रात्री ११ वाजून १३ मिनिटांनी जमिनीवरील चंद्रशिलेवर वर्तुळाकार कवडसा पडला होता. या चंद्रप्रकाशाचा वर्तुळाकार कवडसा, जमिनीवरच्या चंद्रशिलेच्या दगडाशी जुळून आला होता. हे दृश्य डोळ्यांत साठवण्यासाठी उपस्थितांनी गर्दी केली होती.