शिवाजी सावंत गारगोटी: पिंपळगांव परिसरातील एका हॉटेलमध्ये भुदरगड पोलिस ठाण्याचा पोलिस कर्मचारी तानाजी रामचंद्र विचारे हा दारूच्या नशेत हॉटेल चालकाला मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या पोलिस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गारगोटी गडहिंग्लज महामार्गावरील पिंपळगांव येथे एक हॉटेल आहे. या ठिकाणी भुदरगड पोलिस ठाण्याचा कर्मचारी तानाजी विचारे हा काल, बुधवारी दुपारच्या सुमारास जेवण्यासाठी गेला होता. प्रत्येकवेळी तो त्या हॉटेलात मुजोरी करीत असल्याची चर्चा सुरू आहे. पण हॉटेल चालक त्याच्याकडे पोलिस असल्याने दुर्लक्ष करत होते. पण काल, बुधवारी दुपारी मद्यधुंद अवस्थेतील या पोलिसाने कहर केला.हॉटेल मधील कर्मचाऱ्यांनी सर्व्हिस चांगली दिली नसल्याने त्याचा इगो दुखावला गेला. या रागातून त्याने पैसे देण्यास नकार दिला. चालकाने यांबाबत विचारताच चक्क त्यालाच मारहाण सुरू केली. त्याची ही दादागिरी सीसीटिव्ही कॅमेऱ्यात टिपली जात असल्याचे भान त्याला नव्हते.पोलिसांची प्रतिमा मलिन करणाऱ्या या मग्रूर पोलिसावर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी सर्व सीसीटिव्ही फुटेज मागवून घेतले. पंचनामा करून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्याबाबत गुरुवारी संध्याकाळी हालचाली सुरू झाल्या आहेत."सदरक्षणाय खलनिग्रहणाय"असे ब्रीदवाक्य असलेल्या पोलिस खात्यातील काही कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीने संपूर्ण खातेच बदनाम होत आहे.अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर संपूर्ण तालुक्याची सुरक्षा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी धडपडणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना नाहक बदनामीची नामुष्की पत्करावी लागत आहे. दरम्यान याबाबत पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,तानाजी विचारे यांनी केलेली गैरकृत्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.
Kolhapur: पोलिसाचा हॉटेलमध्ये दारू पिऊन धिंगाणा; मालकास मारहाण, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 4:49 PM