कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूर जिल्ह्यातील विविध राज्यमार्ग आणि जिल्हा मार्गांवर तब्बल साडे चार कोटी रुपये खर्चून झाडे लावणार आहे. परंतु या कामाची ई-निविदा उपलब्ध होण्याचा कालावधी १० आक्टोबर असताना जाहिरातही त्याच दिवशी प्रसिद्ध झाल्याने हे काम नेमके कोणाच्या सांगण्यावरून काढण्यात आले आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठ, दहा वर्षांत अनेक राज्य आणि जिल्हा मार्गांचे डांबरीकरण, सिंमेट काॅंक्रीटीकरण झाले आहे. रुंदीकरणासाठी अनेक ठिकाणी झाडे तोडावी लागली आहेत. यासाठी म्हणून या रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्यात येणार आहेत. करवीर तालुक्यातील तीन राज्यमार्ग आणि एका प्रमुख जिल्हा मार्गावर झाडे लावण्यासाठी ४३ लाख १८ हजार रुपये खर्च होणार आहेत. हातकणंगले तालुक्यातील पाच राज्यमार्गांवर झाडे लावण्यासाठी ५० लाख ६३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याच तालुक्यातील १२ प्रमुख जिल्हा मार्गांवर झाडे लावण्यासाठी ४६ लाख २६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
कागल तालुक्यातील ९ प्रमुख जिल्हा मार्गांवर झाडे लावण्यासाठी ६१ कोटी १३ लाख रुपयांचा निधी असून शिरोळ तालुक्यातील ३ राज्यमार्ग आणि ११ प्रमुख जिल्हा मार्गांवर दुतर्फा झाडे लावण्यासाठी तब्बल १ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुळात झाडे लावण्यासाठी आणि ती तीन वर्षे देखभाल करण्यासाठी साडे चार कोटी रुपयांचा खर्च येतो का अशी विचारणा होत आहे.
किती उंचीची झाडे हे महत्त्वाचेअनेकवेळा कमी उंचीची झाडे लावल्याचा फायदा होत नाही. ती चार, पाच फूट उंचीची घेतली तरच ती झाडे जगण्याची आणि नंतर वाढण्याची शक्यता असते. कारण जनावरांकडून अशी झाडे खाण्याचे प्रमाण अधिक आहे. मुळात संबंधित ठेकेदारावर तीन वर्षे देखरेख कोण ठेवणार असाही प्रश्न असून ही प्रक्रिया ‘मॅनेज’ आहे का अशीही विचारणा होत आहे.