हातकणंगले : हेरले (ता. हातकणंगले) येथील संजयनगर माळभाग येथील गट नं. ४४५ / २३ ग्रामपंचायत मिळकत नं. ३२४९ या स्वमालकीच्या मिळकतीमध्ये असलेले प्रार्थनास्थळ महसूल आणि पोलिस प्रशासनाने मंगळवारी सकाळी जमीनदोस्त केले. यामुळे गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले असून, येथे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.हेरले येथे महापुरुषांच्या जयंतीनिमित्त लावलेला शुभेच्छा डिजिटल फलक २४ एप्रिलला रात्री एका अज्ञात समाजकंटकाने फाडल्याची घटना घडली. त्यामुळे गावामध्ये तणाव निर्माण झाला. या घटनेने हिंदुत्ववादी संघटनांनी गाव बंद ठेवून जिल्हा पोलिसप्रमुख, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देऊन या वादग्रस्त जागेवर धार्मिक प्रार्थनास्थळाचे बांधकाम सुरू असून, ते तत्काळ थांबवावे, अशी मागणी केली. जिल्हा प्रशासनाने तालुका प्रशासनाला तत्काळ आदेश देऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले. ग्रामपंचायतीने २८ एप्रिलला नोटीस देऊन मंजुरीपेक्षा जादा असलेले ५८ चाैरस मीटर बांधकाम तत्काळ काढून घ्यावे असे सांगितले, तर तहसीलदार हातकणंगले यांनी वादग्रस्त गट नं. ४४५/२३ मधील बिगरशेती प्लॉटमधील बांधकाम बिगरपरवाना आहे ते बंद करावे, बांधकाम काढून टाकावे अन्यथा महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम कलम ५२ (१) सह कलम ४३ अन्वये पोलिस ठाण्यात गुन्हा व खटला दाखल करण्याची नोटीस २७ एप्रिल रोजी देऊन २४ तासांत कारवाई करू अशी नोटीस बजावली. वैयक्तिक गट नंबरमधील अर्धवट स्लॅबला आलेले आर.सी.सी. बांधकाम मंगळवारी २ मे राेजी धार्मिक प्रार्थनास्थळ असल्याच्या तक्रारीवरून तीन जे.सी.बी., दोन डंपर, पोलिस आणि महसूल प्रशासनाच्या दोनशे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व विरोध मोडून काढत प्रशासनाने जमीनदोस्त केले. या कारवाईमध्ये हातकणंगलेच्या तहसीलदार कल्पना ढवळे, उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजणे, निवासी तहसीलदार दिगंबर सानप, सात पोलिस अधिकारी यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा सहभागी झाला होता; या वादग्रस्त बांधकाम पाडण्याच्या ठिकाणी, पत्रकार, ग्रामस्थ यांच्यासह कोणासही जाण्याची परवानगी दिली नव्हती.
पोलिस ठाण्याकडून सलाेखा बैठकसंजयनगर येथील वादग्रस्त गट नंबरमधील प्रार्थनास्थळ बांधकामाबाबत १ मे रोजी सकाळी हेरले केंद्रशाळेमध्ये शांतता, बंधुभाव, जातीयता सलोखा राहावा यासाठी हातकणंगले पोलिस ठाण्याने सामाजिक सलोखा बैठक आयोजित केली होती. यावेळी इचलकरंजीचे अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खारमोटे यांनी गावात शांतता व सलोखा टिकवून ठेवावा, असे ग्रामस्थांना आवाहन केले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैजणे यांच्यासह हातकणंगले पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी या शांतता बैठकीस उपस्थित होते.प्रेस नोट काढू - तहसीलदार हेरले येथील गट नंबरमधील वादग्रस्त बांधकाम पाडल्याच्या कारवाईबाबत तहसीलदार कल्पना ढवळे यांना दोन ते तीन वेळा प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी बोलणे टाळले. ‘प्रेस नोट काढू,’ एवढेच उत्तर दिले.
हेरले येथील गट नंबर ४४५ / २३ हा २ / ३ / १९८२ मध्ये बिगरशेती झालेला तहसीलदार लेआऊट मंजुरीचा प्लॉट आहे. ग्रामपंचायत ठराव ५ / ३९ ने १७ जानेवारी २३ ला १४६६८ रुपये बांधकाम परवाना शुल्क भरून बांधकाम परवाना घेतला आहे. आर.सी.सी. इमारत अद्याप पूर्ण नाही. स्लॅब पडलेला नसताना प्रार्थनास्थळ ठरवून प्रशासनाने २३ लाखांचे बांधकाम जुलमी पद्धतीने जमीनदोस्त केले आहे. प्रशासनाच्या या कारवाईविरुद्ध न्यायालयाकडे दाद मागणार आहे. - बालेचाँद जमादार, जागामालक