कोल्हापूर : वंचित बहुजन आघाडीचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील नेते हाजी अस्लम सय्यद यांनी मंगळवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले.
अस्लम सय्यद यांनी २०१९ ची हातकणंगले लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडीकडून लढवली होती. त्यांनी तब्बल एक लाख २५ हजार मते घेतली होती. त्यावेळी सय्यद यांची जिल्ह्यात जोरदार चर्चा झाली होती.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवत हजारो मुस्लिम कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करीत आहेत व शिवसेनेच्या भूमिकेला पाठिंबा देत आहेत. आपणही प्रवेश केल्याचे सय्यद यांनी सांगितले. यावेळी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, आसिफ सौदागर, संतोष शिंदे, मोहसीन मुल्लानी, फिरोझ महात, यासीन पठाण, साकिद पठाण, आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही शिवसेना खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली. जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघावर भाजपकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार मंडलिक, माने यांना भाजप चिन्हावर लढण्यास सांगतिलं जाणार की भाजपचा स्वतंत्र उमेदवार असणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, हाजी अस्लम सय्यद यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्याने हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे. तर, निवडणुकीत माजी खासदार राजू शेट्टीसह विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.