कोल्हापूर : नाविन्याच्या ध्यासापायी नवनवीन संकल्पना सुचवायच्या आणि त्या पूर्ण करायच्या त्या कोल्हापूरकरांनीच. चांदीचे चप्पल, चांदीचा मास्कनंतर आता सराफ व्यावसायिक संदीप सांगावकर यांनी चांदीची निमंत्रण पत्रिका तयार केली आहे. आता प्रत्यक्ष घरी जाऊन निमंत्रण देण्याचे प्रमाण कमी झाले आहे. एक चांदीची घसघशीत पत्रिका तयार केली आणि ती सगळ्यांना व्हॉट्सॲपवर पाठवायची. समारंभ पार पडला की फ्रेम करून आठवण जपायची आहे की नाही मस्त कल्पना.चांदी व्यावसायिक संदीप सांगावकर व्यवसायवृद्धीसाठी नेहमीच नवनवीन प्रयोग करत असतात. यापूर्वी त्यांनी चांदीचे चप्पल आणि मागील वर्षी चांदीचा मास्क बनवला होता. आता लग्नसराई सुरू होत आहे, यानिमित्ताने निमंत्रणपत्रिका छापणे ओघाने आलेच. याशिवाय कोणताही कौटुंबिक कार्यक्रम असो निमंत्रण द्यावे लागते. आता घरोघरी जाऊन पत्रिका वाटण्याचे प्रमाण कमी झाले आहे. डिजिटल पत्रिका व्हॉट्सॲपवर पाठवायची आणि फोनवर आग्रहाने बोलवायचे, अशी आता पद्धत आहे.
पत्रिका डिजिटलच पाठवायची असेल किंवा वधू- वराच्या कुटुंबीयांना द्यायची असेल तर मग ती चांदीची का नको? असा विचार करून संदीप सांगावकर यांनी ही पत्रिका बनवली आहे. त्यासाठी ८० ग्रॅम चांदी वापरली असून पत्रिकेचा आकार दहा बाय सात इतका आहे. यासाठी पाच हजारांपर्यंत खर्च येतो. समारंभ संपला की ही पत्रिका फ्रेम करून आठवणी कायमस्वरूपी जपता येतात.