विश्वास पाटीलकोल्हापूर : गेल्या हंगामात तुटलेल्या ऊसाला ज्या कारखान्यांनी तीन हजार पेक्षा कमी रक्कम दिली आहे त्यांनी किमान टनास १०० रुपये व ज्यांनी तीन हजार रुपये दिले आहेत त्यांनी किमान आणखी ५० रुपये देण्यास कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी संमती दिल्याने ऊस हंगामाची कोंडी गुरुवारी रात्री सात वाजता फुटली. यानंतर 'स्वाभिमानी'ने सकाळपासून सुरु असलेले पुणे-बेंगळुरु महामार्गावरील चक्काजाम आंदोलन ९ तासानंतर मागे घेतले.जिल्हा प्रशासन आणि संघटनेच्या प्रतिनिधींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात त्यासंदर्भात चर्चा झाली. मागील हंगामातील ४०० रुपये आणि चालू हंगामातील ऊसाला ३५०० रुपये एकरकमी पहिला हप्ता या मागणीसाठी संघटनेचे गेली २२ दिवस अत्यंत आक्रमक आंदोलन सुरु असल्याने साखर हंगाम ठप्प झाला आहे. ऊसदरासंदर्भात मुंबईत बुधवारी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या दालनात झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही.त्यानंतर ४०० चा आग्रह सोडून देवून संघटनेने टनास किमान १०० रुपये घेतल्याशिवाय आंदोलनातून माघार नाही अशी भूमिका घेतली आणि तीन पाऊले मागे घेतली. एवढी रक्कम देण्याची कारखान्यांची तयारी आहे. ती त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीवेळीही दर्शवली होती. परंतू सत्ताधारी काही नेते मागील हंगामातील काय द्यायचे नाही, चालू हंगामातील पुढचे पुढे बघू अशी भूमिका घेत आहेत. त्यामुळे कारखानदार दबकून होते परंतू आता त्यांनी शंभर रुपये देवून कोंडी फोडली आहे.
पुणे-बेंगळुरु महामार्गावर चक्काजामआज, गुरुवारी सकाळपासून हजारो शेतक-यांनी पुणे-बेंगळुरु महामार्ग रोखून धरला होता. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. दुपारी शेतकऱ्यांची महामार्गावरच जेवणाची पंगत बसली होती. दरम्यान, तोडगा काढण्यासाठी श्रीमंत शाहू महाराज यांनी घटनास्थळी जाऊन राजू शेट्टी यांची भेट घेतली होती.