संदीप आडनाईककोल्हापूर : विशाळगडाजवळील जंगलात संशोधकांना मांसाहारी गोगलगाईची नवीन प्रजात आढळली आहे. सह्याद्रीमध्ये आढळल्यामुळे या गोगलगाईचे सह्याद्रीशिस असे नामकरण केले आहे.मूळचे मिरज तालुक्यातील असलेले संशोधक डॉ. अमृत भोसले सध्या कऱ्हाडच्या सद्गुरु गाडगेमहाराज महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आणि त्यांच्यासोबत ठाकरे वाइल्डलाइफ फाउंडेशनचे तेजस ठाकरे आणि राधानगरी तालुक्याचे डॉ. ओंकार यादव सध्या सातारा जिल्ह्यातील मेढा येथील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे यांना नुकत्याच जाहीर झालेल्या विशाळगड कॉन्झर्वेशन रिझर्व्ह वनक्षेत्रात आंब्याजवळ सप्टेंबर २०१७, ऑगस्ट २०२० आणि सप्टेंबर २०२० मध्ये या प्रजातीच्या गोगलगाई आढळल्या. त्यांच्या ही गोगलगाईची नवीन प्रजात असल्याचे लक्षात आले. यासंदर्भातील संशोधनपर प्रबंध १० जून रोजी ऑस्ट्रेलियातील आंतरराष्ट्रीय जर्नल मोल्युस्कन रिसर्चमध्ये प्रकाशित झाला आहे.
भारतामध्ये गोगलगाईंच्या १,३०० ते १,४०० प्रजाती आढळून येतात. काही परदेशी प्रजातीही देशात आढळतात. पश्चिम घाटात गोगलगाईंच्या ६४ पोटजाती, २३ फॅमिली आणि २८० प्रजाती सापडतात. आंबा येथील नव्या प्रजातीमुळे ही संख्या आता २८१ झाली आहे. ही प्रजात हॅप्लॉप्टिचियस या स्ट्रेप्टॅक्सिड वंशातील आहे. मांसभक्षी गोगलगाईंचा शंख हा कॅल्शिअमचा मोठा स्रोत असतो. काही गोगलगाईंमध्ये नर आणि मादीचे लिंग हे एकाच जिवामध्ये असते. याला ‘हर्माफ्रोडाइट्स’ असे म्हणतात. काही गोगलगाईंमध्ये दोन्ही लिंग स्वतंत्र असतात. काही गोगलगाई या मांसभक्षी असतात. आजूबाजूच्या दुसऱ्या गोगलगाईंची शिकार करून त्या खातात.
शंखामध्ये शिरून त्या गोगलगाईंची शिकार करून आपला उदरनिर्वाह करतात. काही गोगलगाई मृत जिवांवर अन्नग्रहण करतात. महाराष्ट्रात केवळ दोन मोठ्या मांसभक्षी प्रकाराच्या गोगलगाईच्या प्रजाती आढळतात. त्यातील ‘पेरोटेटिया राजेश गोपाली’ ही प्रजात वर्षापूर्वी राधानगरीमधून शोधली होती.
यापूर्वी आढळलेल्या प्रजातींपेक्षा ही वेगळी आहे. झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, डब्लूआरसी, पुणे आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये या प्रजाती जतन केल्या आहेत. लांब लिंग असणारी अद्वितीय जननेंद्रियाची शरीररचना आणि मांसभक्षी हे या प्रजातीचे वैशिष्ट्य आहे. पश्चिम घाटात अशा अजूनही अनेक नवीन प्रजाती असू शकतात, त्याचा आणखी अभ्यास होणे गरजेचे आहे. - डॉ. अमृत भोसले, गोगलगाय अभ्यासक