कोपार्डे : खुपिरे (ता. करवीर) येथे आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. विघ्नेश ऊर्फ विनायक कृष्णात पाटील (वय १९) असे त्याचे नाव आहे. तो आई-वडिलांना एकुलता एक होता. ही घटना बुधवारी रात्री उशिरा घडली आहे. या घटनेची नोंद करवीर पोलिसांत झाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, विघ्नेश याने दहावीनंतर माजगाव (ता. पन्हाळा) येथील औद्योगिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत फिटरचा कोर्स केला होता. तो शेतातील कामाबरोबर जनावरांना वैरण आणण्यास वडिलांना मदत करत असे. आई-वडिलांसोबत निरंकारी बैठकीला नेहमी जाणारा विघ्नेश बुधवारी अंगात कणकणी असल्याचे कारण देत गेला नाही.रात्री साडेदहाच्या दरम्यान आई-वडील घरी आले असता बेडरूममध्ये छताच्या हुकाला विघ्नेशने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. वडिलांनी दोरी कापून त्याला खाली घेतले. नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी कोल्हापूर येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. विघ्नेशच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.
आई-वडिलांना विघ्नेशच्या मनाचा ठाव लागला नाहीशेतकरी व सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती असतानाही विघ्नेशला वडिलांनी मोटारसायकल व मोबाईल दिला होता. तो आई वडिलांना सोडून जात नसे पण विघ्नेशने ठाव आई-वडिलांना लागला नाही. त्याने आत्महत्येसारखे पाऊल का उचलले हे नातेवाईकांना कोड्यात टाकणारे आहे.
दहा वाजेपर्यंत मोबाईल सुरू होतारात्री दहा वाजेपर्यंत विघ्नेशचा मोबाईल ऑनलाईन सुरू होता. दहा वाजून पंधरा मिनिटांनी आई-वडील घरी पोहोचले आणि विघ्नेशने गळफास घेतल्याचे दिसले या पंधरा मिनिटांतच त्यांनी आपली जीवनयात्रा संपवले असावी, अशी चर्चा होती.