युती, आघाडीच्या ‘फुटीरां’चा करेक्ट अहवाल नेत्यांना देणारी यंत्रणा सक्रिय
By समीर देशपांडे | Published: April 24, 2024 12:47 PM2024-04-24T12:47:44+5:302024-04-24T12:47:44+5:30
शिंदे, पवार, फडणवीस, ठाकरे, पवार, सतेज पाटील यांना जातो अहवाल
समीर देशपांडे
कोल्हापूर : जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील ‘फुटीरां’ची माहिती संकलित करून त्याचा अहवाल पाठविणारी यंत्रणा प्रत्येक तालुक्यात सक्रिय झाली आहे. कोण, कोणाचा नेता, कार्यकर्ता कोणाच्या प्रचारात आहे, त्याच्या व्हॉटस ॲपवर कोणाचे ‘मेसेज’ पडत आहेत इथंपासून कोण कोणाच्या सभेच्या ‘मंचा’वर उपस्थित होता याची इत्यंभूत माहिती नेत्यांपर्यंत पोहोचवली जात आहे.
कोल्हापूर लाेकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे शाहू छत्रपती आणि महायुतीचे संजय मंडलिक यांच्या अटीतटीची लढत अपेक्षित आहे तर हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने, राजू शेट्टी, सत्यजित पाटील-सरूडकर यांच्यात प्रामुख्याने लढत आहे. एकीकडे महाविकास आघाडीचे एकमुखी नेतृत्व आमदार सतेज पाटील यांच्याकडे आहे. त्यामुळे दोन्ही मतदारसंघांतील फुटीरांची माहिती प्रामुख्याने सतेज पाटील यांच्याकडे पोहोचवली जात आहे.
पाटील पालकमंत्री असताना अनेकांनी त्यांच्याकडून कामे करून नेली आहेत परंतु त्यातील कोण कोण सध्या विरोधात आहे याची जिल्हा परिषद मतदार संघांनुसार यादी करून त्याची माहिती पाटील यांच्यापर्यंत दिली जात असून त्यानुसार दुरूस्त्या केल्या जात आहेत. याआधीच्या जिल्हा परिषदेच्या सत्तांतरामध्ये हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनीच पुढाकार घेतला होता. त्यामुळे पाटील यांना प्रत्येक मतदारसंघाची माहिती आहे.
काही ठिकाणी उद्धवसेनेतील कोणी काम करत नसतील तर त्याची माहिती उपनेते संजय पवार, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील संपर्कप्रमुख यांच्याकडे दिली जात आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांना माहिती पुरवली जात आहे. यांच्याकडेही त्यांच्या पक्षातील कोण कोणत्या तालुक्यात शांत आहे, याचीही माहिती पोहोच केली जात आहे.
महायुतीमध्ये सध्या पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि भाजपचे खासदार धनंजय महाडिक प्रचारातील प्रमुख आहेत. त्यांचे कोण कार्यकर्ते कुठे नेमके काय करत आहेत याचीही माहिती गोळा केली जात आहे. अशी माहिती ही गरजेनुसार तिघांना पोहोचवतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंतही ही माहिती दिली जात आहे. जेणेकरून तालुक्यातील प्रथम, दुसऱ्या क्रमांकाचे नेते, कार्यकर्ते ठरल्यानुसार काम करत नसतील तर ते दुरूस्त करता येईल.
फोटो नेत्यांना पोहोच
मुश्रीफ यांच्या मतदारसंघातील त्यांना मानणारा एक प्रमुख ठेकेदार सध्या शाहू छत्रपतींच्या प्रचारात आहेत. ते त्यांच्या सभेला स्टेजवरच होते. हा फोटो नेत्यांपर्यंत पोहोचवण्यात आला आहे. त्यानंतर मुश्रीफ यांनी आता आजरा, गडहिंग्लज, भुदरगड दौरा सुरू करून दुरूस्त्या सुरू केल्या आहेत.
तायशेटेंचे कार्यकर्ते काढून घेण्याचे प्रयत्न
आमदार प्रकाश आबिटकर यांचे समर्थक असलेले ‘गोकुळ’चे संचालक अभिजित तायशेटे राजघराण्याशी असलेल्या संबंधांमुळे उघडपणे महाविकास आघाडीच्या प्रचारात असल्याने त्याचीही माहिती वरिष्ठांना देण्यात आली असून तायशेटे यांच्या गटाची ताकद कमी करण्याचे प्रयत्न आता सुरू झाले आहेत.
राजेश पाटील यांचेही लक्ष
चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्या मतदारसंघातील काही कार्यकर्ते अजूनही म्हणावे तसे सक्रिय नाहीत. त्यामुळे पाटील यांनी देखील दौरा सुरू केला असून त्यांनीही ‘शांत’ कार्यकर्त्यांची माहिती घेतली आहे.
गाडी नाही तर प्रचार कसा करू
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुती आणि महाविकास आघाडीचे काही प्रमुख तालुकास्तरीय नेते स्वतंत्र गाडीसाठी अडून बसले आहेत. आम्हांला प्रचाराला अजून गाडीच मिळाली नाही तर प्रचार कसा करायचा असा त्यांचा सवाल आहे.
व्हॉटस ॲपवरील मेसेजचे स्क्रीन शॉट
हातकणंगले तालुक्यातील महायुतीशी संबंधित माजी जिल्हा परिषद सातत्याने सरकारविरोधी मेसेज व्हॉटस ॲपवर टाकत होते. याचे स्क्रीनशॉटही काढून नेत्यांपर्यंत पोहोचवण्यात आले आहेत.