मिलिंद देशपांडेदत्तवाड: महाराष्ट्रातून कर्नाटकात ज्वालाग्रही पदार्थ घेऊन जाणारा टँकर सीमेवरील दानवाड-एकसंबा दरम्यान आज पहाटे उलटला. यामुळे ज्वालाही पदार्थामुळे परिसरात उग्र वास पसरला. सुदैवाने हा टँकर शेतात उलटला. नागरी वस्तीत हा अपघात झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता. या घटनेची माहिती मिळताच एकसंबा येथील अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील दोन किलोमीटरचा भाग सील केला.दानवाड एकसंबा महामार्गावर रामनगर जवळ चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने टँकर क्रमांक (एम.एच-१०-डी.टी-९९००) पहाटे साडेतीन वाजता उलटला. टँकरमधील ज्वालाग्रही पदार्थ स्पिरिट रस्त्याच्या कडेला असणाऱ्या शेतात पसरले. त्याचा उग्र वास सर्वत्र पसरला. पहाटे साखर कारखान्याच्या जाणाऱ्या कामगारांनी एकसंबा पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. हे स्पिरिट अतिशय ज्वलनशील असल्याने अग्निशामक दलाने रामनगरसह दोन किलोमीटरचा परिसर सील करून ज्वलन करण्यास मनाई केली आहे. यामुळे पहाटे या भागातील चुली, गॅस बंद झाल्याने सकाळच्या नाष्ट्या पाण्याशिवाय नागरिकांना उपाशी रहावे लागले. दरम्यान, दुपारपर्यंत दुसरा टँकर आणून ज्वालाग्रही पदार्थ काढून देण्यात आला.
दानवाड-एकसंबानजीक ज्वालाग्रही पदार्थ घेऊन जाणारा टँकर उलटला, दोन किलोमीटरचा परिसर सील
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 2:38 PM