गारगोटी : कोल्हापूर जिल्ह्यातील भूदरगड तालुक्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली. शिक्षकानेच एका अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकारानंतर संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी संबंधित शिक्षकाला यथेच्छ चोप दिला.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सोमवारी (दि.२८) सकाळी पीडित मुलगी शाळेत आल्यानंतर संबंधित शिक्षकाने तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. याबाबतची माहिती पीडित मुलीने आपल्या आई-वडिल व नातेवाईकांना दिली. यासंबंधी जाब विचारण्यासाठी नातेवाईक शाळेत गेल्यावर शिक्षकाने उडवा उडवीची उत्तरे दिली.
दरम्यान या प्रकरणाची माहिती ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना घेराव घालून जाब विचारला. संशयित शिक्षकाला शाळेमध्ये दोन तास डांबून ठेवून चांगलाच चोप दिला.या घटनेची माहिती मिळताच भुदरगड पोलिसांनी संबंधित शिक्षकाला ताब्यात घेतले. तर, गारगोटी ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. मात्र गुन्हा दाखल झाला नाही. याबाबत संशयित शिक्षकाने शाळेतील शिक्षण समितीतील वादातून मारहाण केली असल्याचे सांगितले आहे.
मात्र, दरवर्षी तालुक्यात या संबंधित शाळेतील लहान मुलींच्या विनयभंगाचा एक घडत आहेत. काही मुली तक्रार करतात तर काही भिऊन गप्प राहतात. यावर कठोर कारवाई होण्याची गरज आहे.