इंदुमती गणेशकोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या ४० कोटींतून करावयाच्या कामांची निविदा आचारसंहिता संपताक्षणीच येत्या आठ-दहा दिवसांत काढण्यात येणार आहे. सध्या या निधीत करण्यात येणाऱ्या कामांचे अंदाजपत्रक करून ते तपासणीसाठी देण्यात आले आहे. ही निविदा प्रक्रिया संपेपर्यंत कोल्हापूर महापालिकेला निधी वर्ग होण्याची अपेक्षा आहे.लोकसभेची निवडणूक १६ मार्चला जाहीर झाली. त्याआधीच्या १५ दिवसांत राज्य शासनाने वेगवेगळ्या कामांसाठी निधी मंजुरीचा धडाका लावला. त्यामध्ये कोल्हापूर महापालिकेने २०१९ साली बनवलेल्या अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ४० कोटी मंजूर केले. या निधीचा रीतसर आदेशही निघाला. परंतु, रक्कम काही मिळाली नाही. लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घाईघाईने ही रक्कम जाहीर केली खरी, पण कोल्हापूर महापालिकेच्या खात्यावर वर्ग झालेली नाही.घोषणेची तेवढी घाई केलेल्या शासनाला निधी वर्ग करण्याचा विसर पडला की आचारसंहितेत रक्कम अडकली याबाबत प्रश्नच आहे. परंतु, महापालिकेच्या पातळीवर कामाची तयारी पूर्ण झाली आहे. ठेकेदाराला बिल देण्याची वेळ येते तेव्हा निधीचा प्रश्न उपस्थित होतो, तोपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्याचा महापालिकेचा मानस आहे. तोपर्यंत कदाचित राज्य शासनाकडून निधी देखील वर्ग होईल, अशी अपेक्षा आहे.
निधीअभावी रखडले कामसरस्वती टॉकीज येथील बहुमजली पार्किंग व भक्तनिवासाचे काम निधीअभावी रखडले आहे. येथे तळमजल्यापासून ५ व्या मजल्यापर्यंत पार्किंगची व्यवस्था आहे. सर्वात वरच्या दोन मजल्यावर भक्तनिवास असणार आहे. या कामाला २०१९ मध्ये सुरूवात झाली होती. पण, पहिल्या टप्प्यातील अडथळे आणि आता निधी नसल्याने काम रखडले आहे.
४० कोटींत काय करणारशासनाकडून येणाऱ्या ४० कोटींच्या निधीत सरस्वती टाॅकीज येथील बहुमजली पार्किंग व भक्तनिवासाचे काम पूर्ण केले जाईल. हीच रक्कम जवळपास ३० कोटींच्या आसपास जाते. उरलेल्या १० कोटींमध्ये व्हिनस कॉर्नर येथे उभारण्यात येणाऱ्या बहुमजली इमारतीचे काम करण्यात येणार आहे.
राज्य शासनाकडून ४० कोटींच्या निधीचा आदेश निघाला आहे. प्रशासकीय मान्यता झाली की काम सुरू करण्यास हरकत नसते. त्यामुळे लोकसभेची आचारसंहिता संपताच सत्वर निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल. -नेत्रदीप सरनोबत शहर अभियंता, कोल्हापूर महापालिका