कोल्हापूर : येथील करवीरनगर वाचन मंदिर परिसरातील लक्ष्मी कुरिअर सेंटरचे कुलूप तोडून चांदीच्या १६ विटा लंपास करणा-या परप्रांतीय चोरट्यास जुना राजवाडा पोलिसांनी २४ तासात अटक केली. प्रशांतकुमार श्रीवीरेश यादव (वय २३, मूळ रा. मंगदपूर, जि. आग्रा, राज्य उत्तरप्रदेश, सध्या रा. भऊसिंगजी रोड, कोल्हापूर) असे चोरट्याचे नाव आहे.पोलिसांनी त्याच्याकडून चोरीतील पाच लाख ४७ हजार रुपये किमतीच्या सात किलो ८१ ग्रॅम वजनाच्या चांदीच्या विटा जप्त केल्या. त्याने शुक्रवारी (दि. २१) सकाळी चोरी केली होती. जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी कुरिअर सेंटरमध्ये चोरी झाल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. कुरिअर सेंटरची माहिती असलेल्या व्यक्तीकडूनच चोरी झाल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार उपनिरीक्षक संदीप जाधव यांनी सराफ गल्लीत चांदी पॉलिशचे काम करणारा संशयित प्रशांतकुमार यादव याला ताब्यात घेतले.अधिक चौकशीत त्याने लक्ष्मी कुरिअर सर्व्हिसेस सेंटरमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीतील चांदीच्या १६ विटा जप्त केल्या. प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांसमोर हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. उपनिरीक्षक संदीप जाधव यांच्यासह परशुराम गुजरे, सतीश बांबरे, प्रशांत घोलप, प्रीतम मिठारी, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
Kolhapur: कुरिअर सेंटरमधून चांदीच्या विटा चोरणारा चोरटा २४ तासात जेरबंद, पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 3:14 PM