संतोष मिठारी
कोल्हापूर : जिल्ह्यातील ५४१ प्राथमिक शाळांतीलवीजबिलाची रक्कम थकीत असल्याने तेथील जोडणी (कनेक्शन) बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे या शाळांमध्ये लाखोंचे संगणक, स्मार्ट टीव्ही हाय; पण वीजच नाय, अशी स्थिती आहे.
शासनाने जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक साधनांच्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठी शाळा डिजिटल करण्याच्या अनुषंगाने कोट्यवधीचा निधी दिला. त्यातून प्रयोगशाळांची निर्मिती केली. डिजिटल फलक, प्रोजेक्टर लावले, संगणक, स्मार्ट टीव्ही दिले. त्यासाठी खासदार, आमदार आदी लोकप्रतिनिधींनी काही निधी उपलब्ध करून दिला. मात्र, सध्या करवीर, आजरा तालुका वगळता उर्वरित दहा तालुक्यांतील ५४१ शाळांतील डिजिटल शिक्षणाची साधने वीज नसल्याने बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये अडचण निर्माण झाल्या आहेत.
५४१ शाळांकडे १२ लाखांची थकबाकी
कोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या एकूण १९७७ प्राथमिक शाळा आहेत. त्यापैकी ५४१ शाळांची एकूण १२ लाख १९ हजार ६०७ रुपये इतकी वीजबिलाची रक्कम थकीत आहे. थकीत वीजबिलामुळे महावितरणने या शाळांची वीजजोडणी खंडित केली आहे. त्यातील शाळा गेल्या वर्षभरापासून अंधारामध्ये आहेत.
पैसे आणायचे कोठून?
शाळांना मिळणारे सादील अनुदान अत्यंत कमी असते. त्यातून वीजबिल भरणे शाळांना शक्य होत नाही. त्यासाठी पैसे कोठून आणायचे? असा प्रश्न मुख्याध्यापकांसमोर आहे. थकीत बिलामुळे वीजपुरवठा खंडित केल्याने शाळांमध्ये डिजिटल साधनांना विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे शाळांना राज्य शासनाने मोफत वीजपुरवठा करावा, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव दत्ता पाटील यांनी मंगळवारी केली.
आकडे काय सांगतात?
तालुका | एकूण शाळा | वीज खंडित शाळा |
शाहूवाडी | २६८ | १४० |
भुदरगड | १६१ | ९९ |
हातकणंगले | १७८ | ८८ |
चंदगड | १९९ | ७१ |
राधानगरी | २०५ | ७० |
गगनबावडा | ७० | ३९ |
पन्हाळा | १९४ | १८ |
शिरोळ | १५३ | १२ |
कागल | १२१ | २ |
गडहिंग्लज | १२८ | २ |
कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील थकीत विद्युत देयकाची माहिती शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला कळविण्यात आली आहे. -आशा उबाळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी