कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, सोमवारी पहिल्याच दिवशी सरपंचपदासाठी तब्बल ११९ अर्ज तर सदस्यपदांसाठी १३८ अर्ज दाखल झाले. गगनबावडा तालुक्यात सरपंच व सदस्यपदासाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही. शुक्रवार (दि. २ डिसेंबर) पर्यंत अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे.जिल्ह्यातील ४७४ ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. गावगाड्यातील राजकारणाने गती घेतली असून त्यामुळे तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची व्यवस्था केली आहे. सर्वाधिक ग्रामपंचायती राधानगरी तालुक्यातील ६६ असल्याने तेथील स्थानिक नेत्यांच्या प्रतिष्ठा पणास लागल्या आहेत. सोमवारी पहिल्या दिवशी जिल्ह्यातून ११९ उमेदवारांनी तेवढेच म्हणजे ११९ अर्ज दाखल केले आहेत. सदस्यपदासाठी १३८ अर्ज दाखल केले असून आज, मंगळवारपासून अर्जांचा ओघ वाढणार आहे.
बिनविरोधसाठी जोडण्या....अनेक गावात ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी यंत्रणा सक्रिय झाली आहे. जेवढ्या जागा तेवढेच अर्ज कसे दाखल होतील, यासाठी स्थानिक नेत्यांचे प्रयत्न सुरु आहेत. काही ठिकाणी अर्ज भरल्यानंतर माघारीपर्यंत बिनविरोधसाठी प्रयत्न होणार आहेत.
इच्छुकांची संख्या पाहता दमछाक होणारपहिल्याच दिवशी आलेल्या अर्जांची संख्या पाहता इच्छुकांची संख्या वाढणार हे निश्चित आहे. त्यामुळे पॅनेल बांधणी करताना स्थानिक नेत्यांची पुरती दमछाक होणार आहे.
तालुकानिहाय असे अर्ज दाखल -
तालुका | ग्रामपंचायती | सरपंचपद | सदस्यपद |
शाहूवाडी | ४९ | १४ | ०५ |
पन्हाळा | ५० | ०८ | २९ |
हातकणंगले | ३९ | १२ | १७ |
शिरोळ | १७ | ०६ | ०४ |
करवीर | ५३ | २० | २७ |
गगनबावडा | २१ | ० | ० |
राधानगरी | ६६ | १८ | १८ |
कागल | २६ | ०७ | ०४ |
भुदरगड | ४३ | १४ | १० |
आजरा | ३६ | ०९ | १५ |
गडहिंग्लज | ३४ | १० | ०७ |
चंदगड | ४० | ०१ | ०२ |