इचलकरंजी : येथील मंगलमूर्ती चित्रमंदिर परिसरातील एका ट्रेडिंग व्यापाऱ्याने तीन ते चार कोटी रुपयांचे दिवाळे काढल्याची चर्चा शहरात सुरू आहे. यामध्ये अडकलेल्या काही सूत व्यापाऱ्यांनी गावभाग पोलिस ठाण्यात धाव घेत गाऱ्हाणे मांडले. मात्र, रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल झाली नव्हती. या प्रकारामुळे वस्त्रोद्योगात खळबळ उडाली आहे.पलायन केलेला तो व्यापारी सूत खरेदी करून कापड विणण्यासाठी यंत्रमागधारकांना देत होता. तसेच तयार कापड पुढे विक्री करीत होता. परंतु काही दिवसांपासून त्याच्याकडून व्यापाऱ्यांची देणी थकल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे काही सूत व्यापारी तसेच सराफी करणाऱ्यांनी त्याच्याकडे वसुलीसाठी तगादा लावला होता. या तगाद्यामुळे संबंधित व्यापाऱ्याने दोन दिवसांपूर्वी पत्नीसह शहरातून पलायन केल्याची चर्चा आहे. त्याचा संपर्क होत नसल्याने शुक्रवारी दिवसभर सूत बाजारात खळबळ उडाली होती. काही व्यापाऱ्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. संबंधित व्यापाऱ्याचा संपर्क होत नसून त्याच्या परिवारातील काही सदस्य अजूनही शहरात आहेत. त्यामुळे सर्वजण निघून जाण्यापूर्वी त्याचा शोध घ्यावा आणि कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केल्याचे वृत्त आहे. परंतु प्रत्येकाचा आकडा वेगवेगळा असल्याने एकूण निश्चित आकडा समोर आला नाही. याबाबत काहींनी एकत्र येत तक्रार देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सध्या अंदाजे तीन ते चार कोटींचे दिवाळे काढल्याची चर्चा आहे.
दरम्यान, पैशांसाठी काही सूत व्यापाऱ्यांनी त्याच्याकडे तगादा लावला होता. तसेच त्याला धमकावण्यात येत होते. त्यामुळेच त्याने पत्नीसह शहर सोडल्याचीही चर्चा आहे. याबाबत अडकलेल्या रकमेचा संबंधितांनी हिशेब केल्यानंतर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.