प्रकाश पाटीलकोपार्डे : कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर दोनवडे (ता. करवीर) फाट्यावर सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे झाड उन्मळून कोसळले. यात झाडाखाली लावलेल्या एका दुचाकीचा चक्काचूर झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर, या मार्गावरील वाहतुकीची मोठी कोंडी झाली. गोवा राज्यासह गगनबावडा, तळेरे, तसेच सिंधुदुर्ग व रत्नागिरीसह तळ कोकणात जाणारी वाहतूक तब्बल एक तासाहून अधिक काळ ठप्प झाली होती.सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसामुळे दोनवडे येथे भले मोठे पिंपळाचे झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली. दुपारच्या सुमारास हे झाड पडले. शंभर वर्षापेक्षा जुने हे झाड आहे. या झाडाखाली लावलेल्या दुचाकीवर मध्यभागी झाड पडले. दुचाकीचा चक्काचूर झाला. रस्त्यातच झाड पडल्याने कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, या मार्गावरील वाहतूक साबळेवाडी-खुपिरे व दोनवडे-वाकरे मार्गे सुरू होती. जवळचा रस्ता असल्याने वाहतूक दोनवडे-वाकरे रस्त्याने सुरू होती.
कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर झाड कोसळले; एका दुचाकीचा चक्काचूर, वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 3:49 PM