कोल्हापूर : कोल्हापुरात प्लास्टिक कपमुक्त चहागाडी अभियानास वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशनने गुरुवारी प्रारंभ झाला. वृक्षप्रेमी संस्थेकडून कोल्हापुरातील विविध भागांतील १०० चहा गाडीवाल्यांचे प्रबोधन करून त्यांना २ डझन स्टीलचे कप भेट म्हणून देण्यात आले.पूर्वी चहा पिण्यासाठी चिनी मातीचे, काचेचे, स्टीलचे कप सर्रास वापरात असायचे; परंतु लॉकडाउननंतर जेव्हा व्यवसाय सुरू झाले तेव्हा आजाराच्या भीतीमुळे प्लास्टिक आणि कागदी कपचा सर्रास आणि बेसुमार वापर सुरू झाला आहे. सध्या मात्र युज अँड थ्रो कप वापराची जणू सवयच सर्व दुकानदारांना आणि ग्राहकांना देखील लागली आहे. यातून लाखो प्लास्टिक आणि कागदी कपांची दैनंदिन कचऱ्यामध्ये भर होत आहे. याचा ताण स्थानिक प्रशासनावर स्वाभाविकच पडत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी वृक्षप्रेमी संस्थेकडून कोल्हापुरातील विविध भागांतील १०० चहा गाडीवाल्यांचे प्रबोधन करण्यात आले आणि त्यांना प्लास्टिक आणि कागदी कपचा वापर बंद होण्यासाठी प्रोत्साहन भावनेतून प्रत्येकी २ डझन स्टीलचे कप भेटवस्तू म्हणून देण्यात आले. येत्या २ महिन्यांमध्ये शहरातील २०० चहा टपरीधारकांना या प्लास्टिक कपमुक्त चहागाडी अभियानामध्ये समाविष्ट करून घेणार आहोत.या उपक्रमामध्ये डॉ. विदुला स्वामी, वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुढ्ढे, कुंजन पाटील, सविता साळोखे, विद्या पाथरे, मनीषा शिरोलीकर, निखिल शेट्ये, महादेव मोरे, सचिन पोवार, सागर वासुदेवन, प्रा. प्रफुल्ल खेडकर, आदी वृक्षप्रेमी संस्थेचे सदस्य उपस्थित होते.
प्लास्टिकला केले बाय; स्टीलच्या ग्लासमधून येणार गरमागरम चाय!
By संदीप आडनाईक | Published: October 27, 2023 1:02 PM