शिरोली : शिरोली येथील ग्रामविकास अधिकारी विठ्ठल भावकु भोगण(वय ५०, रा. प्लॉट नं. ३०३, गंगाधाम सोसायटी, गणेश मंदिर शेजारी जाधववाडी, कोल्हापूर. मुळ गाव कोवाड,ता. चंदगड) आणि पंटर शामराव उर्फ भारत बापू परमाज, (वय ६०, रा.चौगुले गल्ली शिरोली पुलाची,ता. हातकणंगले जिल्हा कोल्हापूर) ४ हजारची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला रंगेहाथ सापडले. ही घटना दुपारी चारच्या सुमारास घडली.
अधिक माहिती अशी तक्रारदार यांनी आपल्या घराशेजारील चिकन दुकानाचा त्रास होतो म्हणून अतिक्रमण काढण्यासाठी भोगण यांच्याकडे विनंती अर्ज ग्रामपंचायतीकडे केला होता. शिरोली ग्रामपंचायतचा ग्रामसेवक भोगण याने शिरोलीमधील अतिक्रमण काढण्यासाठी ५ हजार ची मागणी केली होती. याबाबत संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत विभागाला कळवले होते. त्यानुसार हे पथक शिरोली ग्रामपंचायत चौकात दाखल झाले होते. आणि दबा धरून बसले होते.
गुरुवारी याबाबत तक्रारदाराने तडजोडी अंती ४ हजार रुपये देण्याचे कबुल केले. दुपारी चार वाजता भोगण च्या शेजारी बसलेल्या एजंट शामराव उर्फ भारत बापू परमाज याच्या हातात पैसे दिले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी थेट ग्रामपंचायत मध्ये गेले आणि ग्रामपंचायत दरवाजा बंद करून सर्व कर्मचाऱ्यांना मोबाईल बंद करण्यास सांगितले. भोगण आणि त्याचा एजंट परमाज या दोघांना थेट रंगेहाथ पकडले. यावेळी परमाज याने भोगण याच्या सांगण्यावरून पैसे घेतले असे सांगितले.
यानंतर दोघांना ही गाडीतून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कोल्हापूर कार्यालयात नेले आणि गुन्हा दाखल केला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे, पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव बंबरगेकर, विकास माने, रुपेश माने, मयूर देसाई, विष्णू गुरव, यांनी केली. या घटनेमुळे शिरोली गावात सर्वत्र खळबळ उडाली होती. भोगणवर कारवाई झाली ति योग्यच झाली या आधिच व्हायला हवी होती. असे अनेकजण म्हणत होते.
शिरोली ग्रामपंचायत मध्ये सकाळी १०.३० वाजता आमदार राजूबाबा आवळे यांच्या विकास कामांच्या कार्यक्रमाला ग्रामविकास अधिकारी व्ही बी भोगण हे उपस्थित होते. यानंतर ११.३० च्या सुमारास पंटर भरत परमाज सोबत बाहेर गेले होते.