कोल्हापूर : 'देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्यांने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे'...वि.दा. करंदीकर यांच्या या काव्यपंक्तीला साजेशा दातृत्वाची शनिवारी कोल्हापुरच्या सीपीआर चौकात प्रचिती आली. 'नको असेल ते द्या हवे असेल ते घेवून जा' हे ब्रीद वाक्य घेवून घेऊन सीपीआर चौकात शनिवारी (दि.४) माणुसकीची भिंत उभी राहिली. जे नको आहेत असे असंख्य कपडे देण्यासाठी शेकडो दातृत्वांची रीघ लागली. याच दातृत्वातून हजारो गरजवंतांना ऐन दिवाळीच्या तोंडावर कपडे देऊन ही माणुसकीची भिंत अधिक मजबूत केली. शनिवारी सकाळी दहा वाजता आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते गरजूंना कपडे वाटप करुन या उपक्रमाची सुरूवात झाली.गोर-गरीबांची दिवाळी आनंदाने साजरी व्हावी, त्यांना किमान नवे-जुने वापरण्या योग्य कपडे मिळावेत, या उद्देशाने माणुसकीची भिंत हा उपक्रम गेल्या सात वर्षांपासून सुरु आहे. गरजूंना वापरता येतील, असे स्वच्छ कपडे सीपीआर चौकात आणून द्यावेत, तसेच गरजूंनी ते घेवून जावेत, असे आवाहन संयोजकांनी केले होते. या आवाहनला शेकडे नागरिकांनी प्रतिसाद दिला. सकाळी नऊ वाजल्यापासूनच सीपीआर चौकात उभारलेल्या मंडपात कपडे देण्यासाठी रीघ लागली होती.
आज रविवारी रात्री ८ वाजेपर्यंत हा उपक्रम सुरु राहणार आहे. मुस्लिम बोर्डींगचे अध्यक्ष गणी आजरेकर, सुधर्म वाझे, उद्योजक प्रशांत पोकळे, संदीप नष्टे, डॉ. प्रा. महादेव नरके, संतोष पाटील, सुखदेव गिरी, सचिन पाटील, प्रसाद पाटील, अमरसिंह पाटील, सुरज पाटील, निनाद कामत, इम्तियाज मोमीन, डॉ. देवेंद्र रासकर, प्रवीण पाटील, आदी परिश्रम घेत आहेत.
आपण सहज म्हणतो आताच्या जमाण्यात माणूसकी संपली, पण लोक गरजूंना मदतीसाठी पुढे येण्यास उत्सुक असतात हे माणुसकीची भिंत हे उत्तम उदाहरण आहे. समाजातील गरजवंताच्या मदतीला यानिमित्ताने आपण उपयोगी पडलो ही भावना निश्चितच आनंद देणारी आहे. - आमदार सतेज पाटील