कोल्हापूर : सानेगुरुजी वसाहत येथील इस्कॉन मंदिरात दर्शनासाठी जाताना अचानक घोडा आडवा आल्याने दुचाकी घसरून झालेल्या अपघातात शोभा सदानंद शिपुरे (वय ५३, रा.ममदापूर, ता.निपाणी, जि.बेळगाव) या गंभीर जखमी झाल्या होत्या. सीपीआरमध्ये दाखल केल्यानंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. हा अपघात सोमवारी (दि. २३) सायंकाळी मोरेवाडी ते आरकेनगर रोडवर जिजामाता सांस्कृतिक हॉलजवळ झाला.शोभा शिपुरे या मुलगा ओंकार याच्यासोबत दुचाकीवरून सानेगुरुजी वसाहत येथील इस्कॉन मंदिरात दर्शनासाठी निघाल्या होत्या. आरकेनगर येथील जिजामाता सांस्कृतिक हॉलजवळ अचानक त्यांच्या दुचाकीच्या आडवा घोडा आला. त्यावेळी दुचाकी घसरून झालेल्या अपघातात त्या रस्त्यावर पडल्या.परिसरातील नागरिकांच्या मदतीने मुलाने त्यांना गंभीर जखमी अवस्थेत सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. रात्री उशिरा या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली. त्यांच्यापश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.भटक्या जनावरांमुळे अपघातआरकेनगर, मोरेवाडी, शेंडा पार्क परिसरात भटक्या जनावरांची संख्या वाढली आहे. अचानक जनावरे रस्त्यावर येत असल्याने अपघात घडत आहेत. महापालिकेसह पाचगाव आणि मोरेवाडी ग्रामपंचायतींनी तातडीने भटक्या जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Kolhapur: घोडा आडवा आल्याने दुचाकी घसरून महिला ठार, देवदर्शनासाठी जातानाच काळाचा घाला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 12:43 PM