कोल्हापूर : लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एएस ट्रेडर्सविरोधी कृती समितीचा प्रमुख विश्वजित सचिन जाधव (रा. आयडियल कॉलनी, फुलेवाडी) याच्यावर शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बंदुकीचा धाक दाखवून त्याने २०१८ पासून लैंगिक शोषण केले. दोनवेळा गोळ्या देऊन गर्भपात केल्याचाही उल्लेख पीडितेने फिर्यादीत केला आहे.गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या एएस ट्रेडर्स कंपनीच्या विरोधात विश्वजित जाधव याने काही गुंतवणूकदारांना सोबत घेऊन विरोधी कृती समिती तयार केली होती. या समितीच्या माध्यमातून त्यांनी तपासाबाबत उच्च न्यायालयात पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्याच्या विरोधात एका तरुणीने शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पीडितेच्या फिर्यादीनुसार संशयित जाधव याने लग्नाचे आमिष दाखवून २०१८ पासून वारंवार शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. बंदुकीचा धाक दाखवून आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती घालून लैंगिक शोषण केले. गर्भधारणा झाल्यानंतर दोनवेळा गोळ्या देऊन गर्भपात घडवून आणला. मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्रास असह्य झाल्याने अखेर तिने शाहूपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
बंदुकीचा धाक दाखवून महिलेचे लैंगिक शोषण, दोनवेळा केला गर्भपात; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 15:50 IST