कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरासह परिसरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. या गर्दीचा फायदा घेऊन भाविकांकडील मौल्यवान वस्तूसह पाकिटावर डल्ला मारणाऱ्या एका सराईत महिलेला रंगेहाथ पकडण्यात आले. जुना राजवाडा पोलीस आणि महालक्ष्मी देवस्थान समितीच्या सुरक्षारक्षकांनी आज, शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही कारवाई केली. सविता गोविंद अवतळे (वय ३६, रा. आष्टा कासार, जि. सोलापूर) असे या महिलेचे नाव आहे.सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित महिलेच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्या. यावेळी मंदिरात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, पोलीस कॉन्स्टेबल राजू कांबळे यांनी तातडीने या महिलेस ताब्यात घेतले. यावेळी तिच्याकडे चौकशी केली असता तीने मंदिर परिसरातून दोन भाविकांच्या पाकिटावर डल्ला मारण्याची कबुली दिली. या महिलेकडून ताब्यात घेतलेल्या पर्समध्ये सात हजार रुपयांची रक्कम आढळून आली.आज सकाळपासून अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दर्शन रांगेत संशयित महिला भाविकांमधून मागेपुढे करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले. यावरुन पोलिसांना संशय आला असता संबंधित महिलेला ताब्यात घेतले. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Crime News kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांचे पाकिट मारणाऱ्या महिलेस रंगेहाथ पकडले, घटना सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 2:42 PM