कोल्हापूर : वडिलांच्या मृत्यूनंतर आजोळच्या मदतीने हिंमतीने आईला आधार दिला. स्वत:च्या कमाईतून घर उभं केलं. लग्न झालं. आता बहिणीच्या अंगाला हळद लावायची तयारी सुरू होती, पण काळाने घात केला. २५ वा वाढदिवस साजरा करण्याची लगबग सुरू असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने शिंगणापूरच्या (ता. करवीर) प्रणव प्रकाश पाटील याचा जीवनप्रवास अर्ध्यावरच थांबला. पाटील कुटुंबीय आणि प्रणवच्या मित्रांनी व्हॉट्सॲपला स्टेटस ठेवून प्रणवला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या, पण दुर्दैवाने काही तासातच श्रद्धांजलीचा स्टेटस ठेवावा लागला.प्रणव प्रकाश पाटील... अगदी नावासारखेच कॉमन व्यक्तिमत्त्व. दुर्दैवाने वडिलांचे छत्र हरवले आणि कमी वयातच घराची जबाबदारी अंगावर पडली. आजोळच्या मदतीने त्याने संकटावर मात केली. शिक्षण पूर्ण केले आणि फायनान्स कंपनीत रुजू झाला. मेहनती, प्रामाणिक, मनमिळाऊ, निर्व्यसनी आणि कुटुंबवत्सल प्रणवने त्याच्या कर्तृत्वाच्या जोरावरच अनेकांच्या मनात स्वत:साठी जागा निर्माण केली होती. उत्तरेश्वर पेठेसह चंबुखडी परिसरातही त्याचा मित्र परिवार वाढला होता.दीड वर्षांपूर्वीच प्रणवने चंबुखडी परिसरात नवे घर घेतले होते. नवीन घरातील दुसरा वाढदिवस साजरा करायचा म्हणून त्याने गुरुवारी कार्यालयातून सुट्टी घेतली. वाढदिवसाची तयारी सुरू असताना नियतीच्या मनात मात्र काही वेगळे होते. गुरुवारी सकाळीच प्रणवच्या छातीत दुखू लागले. खासगी रुग्णालयात जाऊन त्याने उपचार घेतले. ईसीजी ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर त्याने दुपारी घरी आराम केला. संध्याकाळी साडेचारच्या सुमारास अचानक छातीत कळ आली आणि बोलता-बोलता प्रणव कोसळला.
काही क्षणातच तो बेशुद्ध पडल्याचे पाहून त्याची आई, पत्नी आणि बहिणीचे हात-पाय गळाले. घाबरलेल्या कुुटुंबीयांनी शेजाऱ्यांच्या मदतीने प्रणवला तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले, पण तोपर्यंत प्रणवच्या आयुष्याची दोरी तुटली होती. अवघ्या २५ वर्षांच्या उमद्या तरुणाचा असा आकस्मिक मृत्यू कोणालाच पटत नव्हता. अश्रू ढाळण्याशिवाय कोणाच्याच हाती काही नव्हते.
फुलांच्या जागी अश्रू
प्रणवच्या वाढदिवसानिमित्त पाटील कुटुंबीय आणि मित्रांनी त्याला शुभेच्छा देणारे संदेश सोशल मीडियात पाठवले. अनेकांनी त्याचे फोटो स्टेटसला लावले होते. घरात वाढदिवस साजरा करण्याची तयारीही सुरू होती. मात्र, आकस्मिक मृत्यूमुळे शुभेच्छा संदेशांच्या ठिकाणीच श्रद्धांजलीचे संदेश पाठवावे लागले.