कोल्हापूर : हृदयाच्या झडपेला झालेल्या दुर्मिळ आजारामुळे त्रस्त असलेल्या इचलकरंजी येथील तरुणाला छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातील निष्णात डॉक्टरांच्या पथकाने बिन टाक्याची जोखमीची यशस्वी शस्त्रक्रिया करत जीवदान दिले. बलून मायट्रल वोल्वोटॉमीतून एकाच सेटिंगमध्ये ही शस्त्रक्रिया करुन या तरुणाला हृदयविकार मुक्त करण्यात या डॉक्टरांना यश आले आहे.
इचलकंजीतील गरीब कुटुंबातील २९ वर्षीय तरुण सहा महिन्यांपासून अतिशय थकवा आणि धापग्रस्त होता. इचलकंजीतील एका नामांकित डॉक्टरानी कोल्हापूरातील हृदयरोग तज्ज्ञ अक्षय बाफना यांच्याशी याबद्दल चर्चा केली. डॉ. बाफना यांनी त्याची सीपीआरमध्ये प्राथमिक तपासणी करून टूडी इको केले, तेव्हा त्याच्या हृदयाच्या झडपेला दुर्मिळ आजार झाल्याचे निदर्शनास आले. पायातल्या अगदी छोट्या रक्तवाहिनीतून ही बिनटाक्याची शस्त्रक्रिया त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत मोफत आणि यशस्वीपणे पार पाडली.
या शस्त्रक्रियेसाठी डॉ. बाफना आणि डॉ. अर्पित जैन यांच्यासह सीपीआरचे अधिष्ठता डॉ. प्रदीप दीक्षित, डॉ. गिरीश कांबळे, बी.पाटील, डॉ. मुल्ला, डॉ. देवरे, डॉ. विदुर, तंत्रज्ञ देवेंद्र शिंदे, उदय बिरांजे, पारिचारिका विभाग प्रमुख मधुरा जावडकर, प्रिया माने, विद्या गुरव, श्रीकांत पाटील, पल्लवी खाडे, सुनिता वोनवर, रेखा पाटील, सायली पवार, सविता अनुसाये, अमृता मेधा, ओतारी इत्यादींनी परिश्रम घेतले.
हृदयाच्या झडपेला होते तीन पाकळ्यांचे दुहेरी छिद्र
माणसांच्या हृदयात तीन पाकळ्यांचे एकेरी छिद्र असणारी झडप असते, परंतु याच्या हृदयाच्या झडपेत तीन पाकळ्यांचे दुहेरी छिद्र होते. त्याच्या हृदयाच्या झडपेच्या क्षेत्राची रूंदीही छोटी होती. त्यामुळे हृदयाची आणि फुफ्फुसाची धाप वाढत होती. डॉ. बाफना आणि डॉ. जैन यांनी रुग्णाच्या नातेवाईकांशी चर्चा करुन हा आजार आनुवंशिक आणि अधिग्रहित असण्याची शक्यता असल्याचे सांगितले.
जाेखीम पत्करुन केली शस्त्रक्रियाअनुवंशिक आजार, अधिग्रहित आणि कमी वय यामुळे ही दोनदा करावी लागणारी बलून मायट्रल वोल्वोटॉमी शस्त्रक्रिया डॉ. अक्षय बाफना आणि त्यांच्या पथकाने जोखीम घेउन एकाच सेटिंगमध्ये पार पाडली. दुहेरी छिद्राला एकेरी छिद्र करून झडपेची रुंदी ०.५ सेंमीपासून वाढून १.७ सेमीची करून ही बिन टाक्याची शस्त्रक्रिया जोखीम पत्करून यशस्वी केली आणि या तरुणाला हृदयविकारमुक्त केले.