जयसिंगपूर : जयसिंगपूरच्या शाहूनगर परिसरात गव्याने सोमवारी रात्री दहा वाजता धुमाकूळ घालत एका तरुणावर हल्ला केला. वन विभाग आणि प्राणीमित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गव्याचा माग धरला. सैरभैर झालेला हा गवा कचरे हौसिंग सोसायटी, शिवशक्ती कॉलनी परिसरात दिसेल तिकडे धावत सुटला. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. रात्री उशिरापर्यंत हा गोंधळ सुरुच होता. अखेर उसाच्या शेतातून गवा कोल्हापूर-सांगली रस्त्याच्या दिशेने पसार झाला. गेल्या दोन दिवसापासून हातकणंगले तालुक्यात नरंदे परिसरात दोन गवे दिसल्याचे वृत्त होते. त्यानंतर सोमवारी सकाळी शिरोळ तालुक्यातील जांभळी, नांदणी परिसरात एक गवा काही शेतकऱ्यांना दिसून आला. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी व गोंधळ केल्याने हा गवा जयसिंगपूर-नांदणी मार्गावरील एका शाळेच्या पाठीमागील ऊस शेतामध्ये गेला असल्याचे दिसून आले.सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोल्हापूर येथील वनविभागाचे पथक, प्राणीमित्र संघटनेचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. अविनाश कांबळे यांच्या ऊस शेतीत गव्याने तळ ठोकल्याने त्या परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती. दरम्यान, गव्यापासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी त्याला कोणत्याही प्रकारची इजा पोहोचू नये, असे आवाहन वनविभागाच्या पथकाने केले आहे. गवा शिरला ऊसातअविनाश कांबळे हे सायंकाळी वैरण घेवून घराकडे गेले होते. याच दरम्यान गवा त्यांच्या ऊस शेतीत गेला. कांबळे यांची ही शेती चारही बाजूने तारेच्या कुंपनेने बंदिस्त आहे. गवा शेतीत गेल्याचे समजताच कुपनचा दरवाजा त्यांनी बंद केला. लोकांची चाहूल लागल्यामुळे तो ऊस शेतीत गेला असावा, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
Kolhapur News: जयसिंगपुरात गव्याचा धुमाकूळ, तरुणावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 1:50 PM