कोल्हापूर : पंचगंगा नदीमध्ये मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना गुरुवारी सायंकाळी घडली. दाऊद मुबारक सय्यद (वय १९, रा. राजेबागस्वार दर्गा परिसर, शनिवार पेठ) असे त्याचे नाव आहे. रमजानचे पवित्र रोजे सुरू असताना ही दुर्घटना घडल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दाऊद सय्यद हा युवक शिरोली येथील मदरशामध्ये शिक्षण घेत होता. रमजान सणानिमित्त वीस दिवसांपूर्वी तो सुटीवर घरी आला होता. गुरुवारी दुपारी चार वाजता तो परिसरातील आठ ते दहा मित्रांसोबत पंचगंगा नदीत पोहण्यासाठी गेला. छत्रपती शिवाजी पुलानजीक घाटासमोर नदीच्या पलीकडे ते सर्व जण पोहत होते. पोहताना तो अचानक गायब झाल्याचे मित्रांच्या लक्षात आले.मित्रांनी पाण्यात त्याचे शोधकार्य राबविले, पण तो मिळाला नाही. महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोधकार्य राबविले, सायंकाळी सातच्या सुमारास त्याचा मृतदेह पाण्यात मिळाला.मृत्यूची माहिती मिळताच त्याचे मित्र व नातेवाइकांनी सीपीआर रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यामुळे रुग्णालय परिसरात गर्दी होती. त्याच्या पश्चात आई, वडील, चुलते, भाऊ, बहीण असा परिवार आहे.