आजरा : आजरा साखर कारखान्याच्या नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड आज, गुरुवारी होत असून, अध्यक्षपदी अशोकअण्णा चराटी यांची निवड निश्चित आहे, तर उपाध्यक्षपदी ‘स्वाभिमानी’चे आनंदराव कुलकर्णी व सुनीता रेडेकर यांची नावे पुढे येत आहेत. काटावरचे बहुमत महाआघाडीकडे असल्याने राष्ट्रवादी- राष्ट्रीय काँगे्रसनेही जोरदार फिल्डिंग लावली आहे. महाआघाडीने २१ पैकी ११ जागांवर विजय मिळवित सत्ता मिळविण्याच्या दिशेने कूच केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून निकालानंतर लगेच सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी विजयी संचालकांना सहलीवर पाठविण्यास प्राधान्य दिले. गेले आठवडाभर महाआघाडीचे संचालक सहलीवर गेले आहेत.सत्ता एकदमच काठावर असल्याने राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रसकडूनही विरोधी आघाडीतील एखादा संचालक गळाला लागेल का, याची चाचपणी करीत आहेत. श्री रवळनाथ आघाडीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी सत्तारूढ आघाडीला आपले सहकार्य राहील, अशी निवडणूक निकालानंतर प्रतिक्रिया दिली आहे. कारखान्याच्या सत्तेतून आगामी जि. प., पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बाहेर राहणे हे राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रसला परवडणारे निश्चितच नाही, याची जाणीवही त्यांना आहे.त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी-राष्ट्रीयकाँगे्रसकडूनही जोरदार प्रयत्न होणार आहेत. प्रसंगी अध्यक्षपदासाठी एखाद्याला पुढे करून गुप्त मतदानाची मागणीही होऊ शकते. (प्रतिनिधी)
‘आजरा’ची आज पदाधिकारी निवड
By admin | Published: June 02, 2016 1:31 AM