कोल्हापूर , दि. २४ : महाविद्यालयीन आणि विद्यापीठ पातळीवरील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी लढा देणारी ‘शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समिती’ ही अधिसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. नोंदणीकृत पदवीधर गटामधून ही समिती लढणार आहे. त्यासाठी उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदाच ‘आजी-माजी विद्यार्थी कृती समिती’ लढणार असल्याचे या समितीचे अध्यक्ष डॉ. प्रवीण कोडोलीकर यांनी सांगितले. या समितीची १५ वर्षांपूर्वी स्थापना झाली. समितीने आतापर्यंत पदवीधरांच्या एम. फिल., पीएच.डी., सेट-नेटबाबतच्या प्रश्नांसह महाविद्यालय, विद्यापीठ पातळीवरील विद्यार्थ्यांच्या समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी विविध स्वरूपांतील आंदोलनांद्वारे लढा दिला. याद्वारे अनेक विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे.
पदवीधर, विद्यार्थ्यांचे काही प्रश्न अजूनही कायम आहेत. त्यांची सोडवणूक करण्यासह याबाबत ठोसपणे पाठपुरावा करण्याच्या उद्देशाने यावेळी अधिसभा निवडणूक लढविण्याचा कृती समितीने निर्णय घेतला आहे. यानुसार नोंदणीकृत पदवीधर गटातील सर्व दहा जागा लढविल्या जाणार आहेत. यात कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांना संधी दिली जाईल. त्या दृष्टीने समितीच्या उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. येत्या दोन दिवसांत उमेदवारांची नावे जाहीर केली जातील.काही संघटनांशी चर्चाया निवडणुकीसाठी कृती समितीसमवेत आघाडी करण्यासाठी काही संघटनांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. त्यांच्याशी प्राथमिक स्वरूपातील चर्चा झाली आहे. शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघा (सुटा)समवेत कृती समिती चर्चा करणार असल्याचे समितीचे अध्यक्ष डॉ. कोडोलीकर यांनी सांगितले.