कोल्हापूर : येथील आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सम्राट नगरातील ओढ्यात उतरून येथील अतिक्रमणाकडे लक्ष वेधले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी ओढ्याची मोजणी करा, ओढ्यातील बिल्डरने केलेले अतिक्रमण हटवा, सम्राट नगरातील जनतेला न्याय द्या, अशा घोषणा देत ओढ्यात उतरून आंदोलन केले.
सम्राट नगरातील ओढ्यात एका बिल्डरने बेकायदेशीरपणे बांधकाम केले आहे. यामुळे ओढ्याचे पात्र कमी झाल्याने पावसाळ्यात पात्रातील पाणी परिसरातील घरांमध्ये घुसत आहे. त्यामुळे ओढ्यातील हे अतिक्रमण काढावे, अशी मागणी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्याकडे केली होती. त्यानंतर देसाई यांनी पाहणी करून ओढ्याची मोजणी करण्याचे आदेश टाऊन प्लॅनिंगच्या प्रशासनाला दिले होते. पण अतिक्रमण काढण्याकडे दुर्लक्ष केले गेले. यामुळे ‘आप’च्या पदाधिकाऱ्यांनी थेट ओढ्यात उतरून आंदोलन केले. या आंदोलनाच्या ठिकाणी उपशहर नगररचनकार रमेश मस्कर, उपशहर अभियंता बाबुराव दबडे यांनी भेट दिली. त्यांनी अतिक्रमण काढण्यासंबंधी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
------------
फोटो : ०९०६२०२१-कोल - आप आंदोलन
सम्राट नगरातील ओढ्यात उतरून आपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.