कोल्हापूर : आम आदमी पार्टीने सोमवारी महापालिकेवर पंचनामा मोर्चा काढला. घरफाळा घोटाळा, खड्डेमय शहर, रखडलेली थेट पाईपलाईन, बंद शाळा, ढपलेबाज कारभार या सर्व मुद्यांचा पंचनामा करून लेखापरीक्षण करा, अशी मागणी केली. गेल्या पाच वर्षांच्या कारभाराचा हिशेब द्या, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. महापालिकेचे सहायक आयुक्त विनायक औंधकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आला.आपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई म्हणाले, महापालिकेमध्ये अनेक विभागांत गैरकारभार समोर आला आहे. यामुळे विभागनिहाय पारदर्शकपणे लेखापरीक्षण करण्यात यावे. यामध्ये घरफाळा घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे.
सॉफ्टवेअरच्या कोडमध्ये बदल, खोट्या पावत्या, अव्यवहार्य व बेकायदेशीर तडजोडीमुळे या विभागात घोटाळा होत आहे. १७ डिसेंबर रोजी दिलेल्या अहवालात घरफाळ्यात ७३ कोटींची तूट दाखवली आहे. ही तूट कोणत्या कारणामुळे आली हे सांगण्यात आलेली नाही. मॉलच्या घरफाळ्यात बेकायदेशीर सवलत देऊन मोठ्या प्रमाणात ढपला पाडला आहे. यावेळी आपचे नीलेश रेडेकर, आदम शेख, सुभाष यादव, राज कोरगावकर, प्रथमेश सूर्यवंशी, महेश घोलपे, आदी उपस्थित होते.१५ दिवसांची डेडलाईन : उत्तम पाटीलशहरात खड्डे मोठ्या प्रमाणात पडले असून, त्याचेही लेखापरीक्षण होणे आवश्यक आहे. रखडलेले थेट पाईपलाईन, शालेय पोषण आहारचा ठेका, या सर्वांचे लेखापरीक्षण झाले पाहिजे. तातडीने लेखापरीक्षक नेमून त्यांचा अहवाल नागरिकांसाठी जाहीर करावा. १५ दिवसांत याची कार्यवाही केली नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा युवाध्यक्ष उत्तम पाटील यांनी दिला.लक्षवेधी फलक४५ कोटींच्या पाणीगळतीचा पंचनामा करा, अमृत योजना, नगरोत्थान योजना, घरफाळा घोटाळा पंचनामा करा, प्रभाग क्रमांक ४८ रायगड कॉलनी गटारींच्या प्रतीक्षेत, ढीगभर खड्ड्यांचा पंचनामा करा.