कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीत ८१ जागा ताकदीने लढविणार असल्याची माहिती आम आदमी पार्टीचे राज्य प्रभारी दुर्गेश पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली. दिल्ली पॅटर्न कोल्हापुरात राबवून महापालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारणार असल्याचेही त्यांनी म्हटले. ‘आप’चे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे व राज्य समिती सदस्यांच्या हस्ते ‘हे आम्ही करणारच’ या घर-टू-घर प्रचार मोहिमेचा प्रारंभ झाला.
दुर्गेश पाठक महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित राज्य समितीच्या बैठकीसाठी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पाठक म्हणाले, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेले विकासाचे दिल्ली मॉडेल हे राजर्षी शाहूंच्या विचारांशी व कृती कार्यक्रमाशी प्रेरित आहे. त्यामुळे ‘आप’ने जे काम दिल्लीत केले तेच कोल्हापूरच्या प्रत्येक गल्लीत करायचे आहे. महापालिकेच्या ८१ जागांवर प्रामाणिक, जनतेची कामे करणाऱ्यांंना उमेदवारी दिली जाईल.
प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे म्हणाले, महापालिकेची निवडणूक सामान्य नागरिकांनी हातात घेतली आहे. त्यांना खाेटी आश्वासन ऐकायची नाहीत. त्यांनी निवडणूक लढवून जिंकणार असल्याचे ठरवले आहे. आम आदमी पार्टी त्यांचे केवळ माध्यम असणार आहे. या पत्रकार परिषदेला आपचे सह प्रभारी दीपक सिंगल, महापालिका निवडणूक प्रचारप्रमुख संदीप देसाई, किशोर मध्यान, धनंजय शिंदे, नीलेश रेडेकर, उत्तम पाटील आदी उपस्थित होते.
चौकट
पाठक म्हणाले...
दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर संपूर्ण कोल्हापूर शहरात वॉर्ड दवाखान्यांद्वारे दर्जेदार प्राथमिक उपचार देणार
महापालिकेचे दाखले घरपोच देणार
पदांच्या खांडोळीला आळा घालत पूर्ण कालावधीचा महापौर देणार
घरफाळ्यातील भ्रष्टाचार करणाऱ्यांना जेलमध्ये टाकणार
घरफाळा आकारणी व वसुलीच्या व्यवस्थेत पारदर्शकता आणणार
शहरातील पार्किंग व्यवस्था सुधारणार