कोल्हापूर : पिरवाडी गावाकडे मागून आलेल्या आरे एस.टी. बसची डंपरला धडक बसली. त्यात चालकासह चारजण जखमी झाले. ही घटना पुईखडी येथील पहिल्या वळणावर शुक्रवारी दुपारी घडली. याबाबतची वर्दी डंपर चालक दीपक विष्णू पोवार (वय २५, रा. पिरवाडी, ता. करवीर) यांनी करवीर पोलिसांत दिली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वर्दीदार डंपर चालक पोवार हा पिरवाडी या आपल्या गावाकडे आपल्या ताब्यातील डंपर घेऊन शुक्रवारी दुपारी जात होते. पुईखडीदरम्यान पहिल्या वळणावर डंपरच्या पुढे असलेल्या दुचाकी चालकाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे डंपरलाही अचानक ब्रेक लावावा लागला. यावेळी मागून येणाऱ्या रंकाळा-आरे या एस.टी. बसच्या चालकाला बस आवरता आली नाही. ब्रेक न लागल्याने बस थेट डंपरला मागून धडकली. त्यात चालकासह चारजण जखमी झाले. जखमींमध्ये शकील बाबन मुल्लाणी (रा. गाडेगोंडवाडी), अण्णा हरी बुडके, दिनकर श्यामराव पोवार, पार्वती शंकर मोहिते यांचा समावेश आहे. याचा तपास पोलीस अंमलदार गुरव करीत आहेत.